पाकच्या मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमानांची स्थिती चांगली !

अजमेर दर्ग्याचे प्रमुख उत्तराधिकारी हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना फटकारले

हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती

अजमेर (राजस्थान) – अजमेर दर्ग्याचे प्रमुख उत्तराधिकारी तथा ‘अखिल भारतीय सुफी सज्जादानशीन परिषदे’चे अध्यक्ष हजरत सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांना फटकारले आहे. भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गुजरातचा कसाई’ आणि ‘रा.स्व. संघाचे पंतप्रधान’ असे संबोधले होते. यावर चिश्ती यांनी म्हटले की, बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या विधानाद्वारे केवळ स्वतःचीच नाही, तर पाकिस्तानी नागरिकांचीही अपकीर्ती केली आहे. पाकने लक्षात ठेवले पाहिजे की, पाकिस्तानमधील मुसलमानांपेक्षा भारतीय मुसलमान अधिक सुरक्षित आणि चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

चिश्ती पुढे म्हणाले की, बिलावल भुट्टो विसरले की, आतंकवादी ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्याने पाकमध्ये येऊन ठार मारले होते. माझा बिलावल भुट्टो यांना सल्ला आहे की, भारताची तुलना पाकिस्तानशी करू नये; कारण आमची राज्यघटना आम्हाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. प्रत्येक मुसलमानाला तो भारतीय असल्याचा गर्व आहे.

संपादकीय भूमिका

  • अशी भूमिका भारतातील प्रत्येक मुसलमान संघटना, त्यांचे प्रमुख, तसेच धर्माचे प्रमुख घेतांना का दिसत नाहीत ?