(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्रवादी देश बनवण्याचा धोका !’  

अमेरिकेचे मावळते खासदार आणि कथित मानवाधिकारवादी अँडी लेविन यांचे विधान  

अमेरिकेचे मावळते खासदार अँडी लेविन

वॉशिंग्टन (अमेरिका) – मी भारतासारख्या देशांतील मानवाधिकारांचा समर्थक राहिलो आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश असतांना भारताला हिंदु राष्ट्रवादी देश बनवण्याचा धोका आहे, असे विधान अमेरिकेचे मावळते खासदार अँडी लेविन यांनी त्यांच्या संसदेतील समारोपाच्या भाषणात केले.

१. लेविन पुढे म्हणाले की, मी हिंदु धर्माचा प्रेमी आहे. जैन, बौद्ध आणि भारतात स्थापन झालेल्या अन्यही धर्मांचा मी प्रेमी आहे; मात्र आपल्याला तेथील सर्वच लोकांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. मग ते मुसलमान असो, हिंदु असो, बौद्ध असो, ख्रिस्ती असो कि जैन असो. (लेविन यांनी भारतातील लोकांच्या मानवाधिकाराची खरीच चिंता असती, तर त्यांनी काश्मिरी हिंदूंच्या मानवाधिकारांसाठी कार्य केले असते; मात्र त्यांची मानसिकता हिंदुद्वेषी असल्याने त्यांना हिंदूंचा मानवाधिकार न दिसता अन्य धर्मियांचाच कथित मानवाधिकार दिसत असल्याने ते अशा प्रकारचे विधान करत आहेत ! – संपादक)

२. लेविन मानवाधिकाराची नेहमीच बाजू घेत आले आहेत. ते म्हणाले की, संपूर्ण जगात अमेरिकाच मानवाधिकाराचे रक्षण करण्यास अधिक यशस्वी ठरली आहे, तर अन्य देशांची स्थिती बिकट आहे. (अमेरिकेत अश्‍वेत नागरिकांच्या मानवाधिकारांविषयी लेविन काय करत आहेत, हेही त्यांनी सांगायला हवे ! जॉर्ज फ्लाईड या अश्‍वेत नागरिकाची पोलिसांनी हत्या केल्यावर अमेरिकेत ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ आंदोलन का झाले ? याविषयी लेविन यांनी सांगायला हवे आणि मग स्वतःची पाठ थोपटून घ्यायला हवी ! – संपादक)

३. लेविन यांनी ‘भारतीय अमेरिकी मुस्लिम परिषदे’सहित अनेक मानवाधिकार संस्थांच्या कार्यक्रमांतून काश्मीरकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते. (यावरून लेविन यांना हिंदूंच्या नव्हे, तर कुणाच्या मानवाधिकारांची चिंता आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक) गेल्या वर्षी त्यांनी भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी मानवाधिकारांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. ते म्हणाले होते की, आजचा भारत तो नाही ज्याच्यावर मी प्रेम करत होतो. भारतावर प्रेम करत असल्यामुळेच तेथील लोकांवर होणार्‍या आक्रमणांना रोखण्यासाठी मी कटीबद्ध आहे. माझी इच्छा आहे की, भारतामध्ये लोकशाही पुढच्या पिढ्यांसाठी समृद्ध व्हायला हवी. (भारतात काय असायला हवे, हे भारत ठरवील. त्यात अमेरिकेने नाक खुपसू नये. ‘अमेरिकेत काय असायला हवे ?’, याचाच विचार लेविन यांनी करावा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जगात ५७ इस्लामी राष्ट्र आणि १०० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटींहून अधिक लोकसंख्या असणार्‍या हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. जर त्यांनी त्यांचे राष्ट्र स्थापन केले, तर लेविन यांसारख्या अन्य धर्मियांच्या पोटात का दुखत आहे ? ते इस्लामी आणि ख्रिस्ती राष्ट्रांत जे काही अल्पसंख्यांवर अत्याचार होतात त्याविषयी तोंड का उघडत नाहीत ?
  • काश्मीरमध्ये बहुसंख्य मुसलमान आहेत आणि तेथे हिंदूंना जिहाद्यांनी हाकलून लावले, ठार मारले, महिलांवर बलात्कार केले, त्याविषयी लेविन यांना बोलावेसे का वाटत नाही ?