सनातन संस्थेच्या एका आश्रमातील एका साधकाने सेवेच्या सोयीसाठी ‘व्हॉटस्ॲप’चा एक गट तात्पुरत्या कालावधीसाठी सिद्ध केला होता. त्यात काही साधकांना सेवेच्या आढाव्यासाठी जोडले होते; परंतु त्यातील एका साधकाचा भ्रमणभाष क्रमांक सध्या तो वापरात नसलेला असा होता म्हणजे त्याने तो बंद केलेला होता आणि आता तो क्रमांक संबंधित साधक वापरत नसून, समाजातील अन्य व्यक्ती वापरत होती. गट सिद्ध करणार्या साधकाकडे त्या साधकाचे २ संपर्क क्रमांक होते. एक क्रमांक नवीन, तर दुसरा जुना होता. जुना क्रमांक त्याने त्याच्या भ्रमणभाषमधून ‘डिलीट’ (पुसून टाकलेला) केलेला नव्हता. गट सिद्ध करणार्या साधकाने घाईत त्या साधकाचा जुना क्रमांक व्हॉटस्ॲप गटात जोडला. त्यामुळे त्या गटातील संभाषण अज्ञात व्यक्तीने पाहिले आणि वाचले. त्या व्यक्तीने गट सिद्ध करणार्या साधकाला २/३ वेळेला भ्रमणभाष करून ‘माझा क्रमांक का जोडला ? कशासाठी जोडला ? तुम्ही माझी पोलिसांत तक्रार करून कोणत्यातरी प्रकरणात अडकवणार, ज्या व्यक्तीचा क्रमांक म्हणून तुम्ही जोडला त्याचा नवीन क्रमांक द्या, मला त्याच्याशी बोलायचे आहे.’, आदी प्रश्न विचारले. अज्ञात व्यक्तीचा संपर्क आल्यावर आपण चूक झाल्याचे सांगूनही वारंवार भ्रमणभाष येत होता, तसेच त्या गटात असणार्या अन्य एका स्त्री साधिकेलाही त्याने ३/४ वेळेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारचे प्रसंग भविष्यात कुणाकडूनही होऊ नयेत, या दृष्टीने साधकांनी स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये असलेले साधकांचे जुने क्रमांक ‘डिलीट’ करावेत, तसेच कोणत्याही सोशल मिडियाच्या गटात क्रमांक जोडतांना निश्चिती करून मगच जोडावे.