लव्ह जिहाद, धर्मांतर यांविरोधी कायद्याची मागणी !
पाटण (जिल्हा सातारा), १३ डिसेंबर (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने रामापूर ते जुनी ग्रामपंचायत मैदान असा ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये कराड आणि पाटण तालुक्यांतील ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.
भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मोर्च्याला प्रारंभ झाला. मारुति चौक, झेंडा चौक, लायब्ररी चौक या मार्गाने पुढे जुनी ग्रामपंचायत मैदानाच्या ठिकाणी मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. या वेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपिठावर पाटणचे तहसीलदार रमेश पाटील आणि नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांना महिला अन् मान्यवर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीतांजली गोंधळेकर यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. पवन तिकडवे यांनी केले. मोर्च्याला पोलिसांकडून विशेष संरक्षण देण्यात आले होते. मोर्च्याची सांगता ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून करण्यात आली.
या मोर्च्यात भाजपचे आमदार नितेश राणे, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, भटक्या विमुक्त आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कराड पाटण तालुक्याचे कार्यवाहक श्री. सागर आमले, श्री. श्रीकृष्ण पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. मिलिंद एकांडे, गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदु मुलीकडे पहाल, तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवीन !
भाजपचे आमदार नितेश राणे यांची चेतावणी
विविध माध्यमांतून हिंदु समाजावर दबाव टाकला जात आहे. या विरोधात आम्ही मोर्चा काढला असून लव्ह जिहादच्या विरोधात सक्षम कायद्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे सक्षम कायदा नसल्याने हिंदु मुलींना संरक्षण देता येऊ शकत नाही. हिंदु मुलींकडे पहाल, तर डोळे काढून म्युझियममध्ये (संग्रहालयात) ठेवीन. येथे हिंदूंची संख्या अधिक असूनही मूठभर जिहादी भारी पडत असतील, तर छत्रपतींसमोर नतमस्तक होण्याची आपली योग्यता आहे का ?
क्षणचित्रे
१. पाटण शहर आणि परिसरातील व्यावसायिक दुकाने बंद ठेवून मोर्च्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
२. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई इत्यादी राष्ट्रपुरुषांच्या जयघोषाने आणि लव्ह जिहादविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
३. मोर्च्यामध्ये हिंदु माता-भगिनी लव्ह जिहादविरोधी संदेश देणारे फलक हातामध्ये घेऊन सहभागी झाल्या होत्या. तसेच युवक भगव्या टोप्या, शेला परिधान करून हातामध्ये झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होते.
संपादकीय भुमिकाहिंदूबहुल महाराष्ट्रात मूठभर जिहादी हिंदूंना भारी पडणे, हे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता अधोरेखित करते ! |