प्रीतीस्वरूप आणि साधकांना आधार देणार्‍या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (१४.१२.२०२२) या दिवशी सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा ८३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या चरणी ८३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. साधक आणि संत यांच्यावरील प्रीती 

अ. पू. आजींना सर्वच साधकांप्रती पुष्कळ प्रेम वाटते. एखाद्या साधकाची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे समजल्यावर पू. आजींचा भाव जागृत होतो. त्यांना पुष्कळ आनंद होतो.

आ. आश्रमात साधकांचा वाढदिवस साजरा होत असतांना पू. आजींना भरून येते. त्या साधकाशी पू. आजींचा फारसा परिचय नसला, तरीही त्या स्वतः साधकापर्यंत जाऊन त्याला शुभेच्छा देतात.

इ. पू. आजींना वयोमानानुसार पुष्कळ थकवा असतो. असे असले, तरीही पू. आजींची नातेवाइकांना भेटण्यासाठी कुठेही जायची सिद्धता असते. स्वतःला कितीही त्रास झाला, तरी इतरांना वाटते, तर ‘आपण जाऊन भेटायला हवे’, असा त्यांचा विचार असतो.

ई. पू. आजींना ‘एखादा साधक किंवा संत रुग्णाईत आहेत’, असे स्वप्नात जरी दिसले, तरी त्या त्वरित संबंधित संत किंवा साधक यांच्यासाठी नामजप चालू करतात. पू. आजी संबंधितांची मानस दृष्ट काढतात. एकदा पू. आजी पुणे येथे गेल्या असतांना त्यांना एका रात्री स्वप्नात ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ थकल्या असून रुग्णाईत आहेत’, असे दिसले. पू. आजींनी त्या क्षणापासून सकाळपर्यंत न झोपता श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यासाठी नामजप केला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची विचारपूस करायला सांगितली. त्यानंतरच पू. आजींनी नामजप करणे थांबवले.

२. साधकांना आधार देणे 

पू. आजी महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर थोडा वेळ भोजनकक्षाच्या बाहेर बसतात. त्या वेळी काही साधक त्यांना अडचणी विचारतात. तेव्हा पू. आजी त्यांना आधार देऊन नेमकेपणाने मार्गदर्शन करतात. साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. आजी त्या साधकांना सांगतात, ‘‘शरणागती वाढवा. देवावर सोपवा. काळजी करू नका.’’ त्या काही साधकांना स्वयंसूचना घ्यायला सांगतात. खरेतर पू. आजींचा त्या साधकाशी फारसा संपर्क नसतो, तरीही पू. आजी त्या साधकासाठी आवश्यक ते सूत्र एका ओळीत सांगतात आणि पुढच्या क्षणी नामजप चालू करतात. काही वेळा त्या साधकांना ‘उत्तरदायी साधकांचे मार्गदर्शन घ्या’, असेही सांगतात.

३. वृद्धापकाळातही उत्तम स्मरणशक्ती 

पू. आजींची एखाद्या साधकाशी दुसर्‍यांदा १० वर्षांनी भेट झाल्यासही पू. आजी ‘साधकाची भेट कुठे झाली होती ?’, हे सांगतात. तेव्हा त्या साधकांनाही ‘पू. आजींनी ओळखले’, याचे आश्चर्य वाटते. पू. आजींना त्या साधकाचे केवळ नाव आणि गावच नाही, तर त्या साधकाशी संबंधित एखादा प्रसंगही आठवतो. पू. आजींनी पूर्वी म्हटलेली सर्व भजने त्यांना आठवतात.

४. ध्यानावस्थेत असणे 

पू. आजींचे सतत ध्यान लागते. त्यांचे ध्यानावस्थेमुळे डोळे आपोआप बंद होतात. त्यांचे काही वेळा जेवतांनाही ध्यान लागत असल्याने त्यांना घास गिळण्याचेही भान रहात नाही. त्या एकटक शून्यावस्थेत पहात असतात.

५. मिताहारी 

पू. आजींचा आहार अत्यल्प आहे. त्यांना खाण्या-पिण्याची विशेष आवड-नावड नाही. त्या पोळीला तेल आणि तिखट लावून आवडीने खातात. एखाद्या साधिकेने चांगल्या भावाने सेवा केली असेल आणि पदार्थ विशेष रूचकर नसेल, तरीही पू. आजी संबंधित साधिकेचे कौतुक करतात.

६. चैतन्यामुळे प्रकृती चांगली असणे

वार्धक्यामुळे पू. आजींचे स्नायू क्षीण झाले आहेत; परंतु त्यांना फारसे शारीरिक त्रास नाहीत. त्यांचे वैद्यकीय अहवाल सामान्य असतात. खरेतर त्यांच्या आहारात कुठलेही सकस पदार्थ नसतात. त्या केवळ तेल आणि तिखट लावलेली पोळी खातात, तरीही चैतन्यामुळे पू. आजींचे आरोग्य वयाच्या मानाने चांगले आहे.

७. सूक्ष्मातील जाणण्याचे सामर्थ्य  

अ. पू. आजींना अकस्मात् एखाद्या साधकाची आठवण येते. त्यानंतर लगेचच त्यांच्या मनात ‘तो साधक गावाला गेला आहे किंवा रुग्णाईत आहे’, असे विचार येतात आणि खरेच त्यानुसार घडलेले असते.

आ. साधकांना होत असलेले त्रास दूर होण्यासाठी पू. आजी साधकांसाठी नामजपादी उपाय करतात. त्या वेळी साधकांना होणारा त्रास पू. आजी स्वतः अनुभवत असतात. त्यामुळे त्यांना साधकांच्या त्रासाची तीव्रता किती अल्प-अधिक झाली आहे, हे लक्षात येते. कुणाला हृदयाशी संबंधित त्रास होत आल्यास त्याची तीव्रता न्यून होईपर्यंत पू. आजींना छातीवर दाब जाणवतो.

८. जाणवलेला पालट

अ. पू. आजींच्या हातांचा आणि चरणांचा कोमलपणा पुष्कळ वाढला आहे.

९. अनुभूती

अधिवक्ता योगेश जलतारे (पू. जलतारेआजींचा मुलगा)

९ अ. पू. आजी नामजप करतांना त्यांना देवतांचे दर्शन होणे : पू. आजी साधकांसाठी नामजप करत असतांना त्यांना देवतांचे दर्शन होते. पू. आजींना कधी सिंहासनाधिष्ठित श्रीराम, तर कधी कैलासपती शिव, तर कधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होते. त्या नामजप करतांना कृतज्ञताभावात असतात.

९ आ. त्या नामजप करतांना उदबत्ती लावलेली नसतांनाही सुगंध दरवळत असतो आणि प्रतिदिन निराळा सुगंध येतो.’

– अधिवक्ता योगेश जलतारे (पू. जलतारेआजींचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)

पू. आजींच्या कपाळावर शुभ चिन्हे उमटणे 

‘पू. आजींच्या कपाळावर ॐ, स्वस्तिक आणि त्रिशूळ ही चिन्हे उमटली आहेत.’

– अधिवक्ता योगेश जलतारे (पू. जलतारेआजींचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.