कोल्हापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – मला ज्ञानी नाही, तर ज्ञानरूप व्हायचे आहे. आपल्याला जर मृत्यूची भीती वाटत असेल, तर हरिपाठ म्हणणे सार्थकी लागले, असे आपण म्हणू शकणार नाही. ‘द्वारकेचा राणा पांडवाघरी’ या उक्तीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या म्हणजे अर्जुनाकडेच का आला ? तर त्याचे चित्त शुद्ध होते. तोच ध्यास आपल्यालाही लागला पाहिजे, असे मार्गदर्शन प.पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांनी केले. करवीरनगर वाचन मंदिर यांच्या वतीने ‘हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य’ या पुस्तक प्रकाशाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी म्हणाले, ‘‘करवीर नगर वाचनालयाची १७२ वर्षांची जुनी परंपरा असून ज्ञान देण्याचे काम संस्थेच्या वतीने अव्याहतपणे चालू आहे. हरिपाठावर अनेक निरुपणे असून दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल, असे हे पुस्तक आम्ही प्रकाशित केले आहे.’’
या प्रसंगी ‘हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य’ या पुस्तकाचे लेखक श्री. सुहास लिमये, मुरुगुड येथील शिवगड अध्यात्म ट्रस्टचे सचिव श्री. बाळकृष्ण चौगुले यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. आशुतोष देशपांडे यांनी केले, तर आभार श्रीमती अश्विनी वळिवडेकर यांनी केले.