‘तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान’कडून पाक सैनिकाचा शिरच्छेद !

हत्येनंतर सैनिकाचे डोके झाडाला लटकवले !

पेशावर (पाकिस्तान) – अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये टीटीपी (तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान) या जिहादी आतंकवादी संघटनेने एका पाकिस्तानी सैनिकाचा शिरच्छेद करून त्याची हत्या केली. यानंतर त्याचे डोके बाजारातील एका झाडावर लटकवण्यात आले. यासह येथे ‘मृताच्या अंत्यसंस्कारात कुणीही सहभागी होऊ नये अन्यथा परिणाम वाईट होतील’, असे धमकीचे पत्रही ठेवण्यात आले आहे. रहमान जमान असे हत्या करण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे.

१. अफगाण पत्रकार सुहैब झुबेरी, तसेच अन्य काही जणांनी सामाजिक माध्यमांवरून ही माहिती दिली. विशेष म्हणजे या संदर्भात पाकिस्तानी सैन्य किंवा सरकार यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यता आलेली नाही.

२. नोबेल शांतता पुरस्कार विजेती पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसूफझाई यांचे वडील झियाउद्दीन यांनी सामाजिक माध्यमांतून याच भागातील आणखी एका घटनेची माहिती दिली आहे. यात टीटीपीचे आतंकवादी ५ डिसेंबरच्या रात्री उशिरा बन्नू जिल्ह्यातील जानीखेल भागात एका घरात घुसले. येथे त्यांनी रहमानउल्ला आणि त्याचा मुलगा शाहिद यांची गोळ्या झाडून हत्या केली. रहमानउल्लाचा मृतदेहही झाडाला लटकवण्यात आला होता. या कुटुंबात आता केवळ १० वर्षांची मुलगी उरली आहे.

संपादकीय भूमिका

‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !