कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण तसे करणार नाही ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

श्री. दीपक केसरकर

कोल्हापूर – कर्नाटककडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करतात ? आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण आम्ही तसे करणार नाही. त्यांनी अविचाराने निर्णय घेतला, तर आपणही तसाच घेणे हे योग्य नाही, सामोपचाराने प्रश्न सुटले पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूरच्या दौर्‍यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कोणत्याही धरणाचे पाणी सोडले की, प्रश्न सुटतात, असे नाही. पाणी योजनेसाठी २ सहस्र कोटी रुपये आम्ही दिले आहेत. कर्नाटककडून सीमा भागांतील नागरिकांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, हे सर्वांना ठाऊक आहे. कर्नाटक त्यांच्या लोकांना बहुभाषा सुविधाही देऊ शकले नाहीत. न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल, असा आमचा विश्वास आहे.’’