१. सत्संगातून कुलदेवी आणि दत्तात्रेय यांच्या नामजपाचे महत्त्व कळल्यावर साधनेला आरंभ करणे
‘मी साधनेला आरंभ केल्यानंतर आमच्या वसाहतीत (कॉलनीमध्ये) सत्संग चालू झाला. त्यामुळे मला कुलदेवी आणि दत्तात्रेय यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. मला सत्संगात जायला आवडत असे. नामजपातील आनंद मी सतत अनुभवत असे.
२. सत्संगात सांगितल्यानुसार कृती केल्यावर घरून साधनेला विरोध होणे आणि त्या वेळी प्रार्थना करून भगवंताचा धावा करणे
एक मासाने माझ्या यजमानांच्या त्रासाचे प्रमाण वाढले. ‘मला विनाकारण त्रास देणे, कारण नसतांना रागावणे’, असे होऊ लागले. सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी कृती करत असे; पण यजमानांचा दृष्टीकोन मला फार वेगळा वाटू लागला. मला ‘रागाच्या भरात ते (यजमान) मला काही करतील कि काय ?’, अशी भीतीही वाटायची. सत्संगामध्ये मला मनमोकळेपणाने बोलता यायचे. त्यामुळे घरी गेल्यावर मला धीर यायचा. प्रत्येक विचार भगवंताला सांगणे आणि प्रार्थना करणे, असे मी करत होते. रात्री परत काही व्हायला नको; म्हणून कृष्णाचा धावा करतच झोपत असे. मधेच जाग आल्यास परत कृष्णाचा धावा चालू करत असे.
३. अल्प व्ययात घर चालवणे कठीण जात असतांना आध्यात्मिक स्तरावर उपाय आणि गुरुकृपा यांमुळे परिस्थिती पालटणे
माझ्या यजमानांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते दिराकडे वेतन देत असत. ते आम्हाला घरखर्चासाठी केवळ ३ सहस्र रुपये देत असत. तेव्हा मला सांगितल्यानुसार मी प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) छायाचित्राला प्रदक्षिणा घालण्यास आरंभ केला. तसेच मी प्रार्थनाही करत होते, ‘प.पू. बाबा एवढ्या अल्प पैशात मी घरखर्च आणि मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा करू ? भगवंता, यातून काय तो मार्ग काढा. देवा, तुम्ही दिलेली शिदोरी दिराकडे आहे आणि ते मजा मारत आहेत. पैसे मागितले की, यजमान मुलांशी भांडायचे.’ मी प.पू. बाबांना पुष्कळ आर्ततेने प्रार्थना केल्यावर भगवंताने परिस्थिती एकदम पालटवली. यजमानांचे पूर्ण वेतन आमच्याकडे येऊ लागले. त्यामुळे मी गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
४. दिराने यजमानांच्या अधिकोषाच्या खात्यातून पूर्ण पैसे काढणे; परंतु त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी यजमानांच्या खात्यामध्ये पुन्हा पैसे जमा करणे
त्यानंतर दिराकडे अकस्मात् आजारपण चालू झाले. यजमानांच्या खात्यातून ते सारखे पैसे काढायचे; कारण त्यांना त्यांचे वेतन पुरत नव्हते. यजमानांचे पूर्ण पैसे काढून झाल्यावर अधिकोषाचे रिकामे पुस्तक त्यांनी आणून दिले. मध्येच दिराची पदोन्नती झाल्यामुळे त्यांचे वेतन वाढले आणि त्यांनी यजमानांच्या खात्यात पैसे जमा केले. हे सर्व परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच होऊ शकले.
५. आर्थिक स्थिती चांगली नसतांना मुलीच्या लग्नात गुरुकृपेने पैशाची सोय होणे
मुलीचे लग्न ठरल्यावर आमच्याकडे पैसे नव्हते. आठ दिवसांवर लग्न येऊन ठेपल्यावर मी परात्पर गुरुदेवांना मनोमन प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, मी असाहाय्य आहे. मला ‘काय करावे ?’, ते सुचत नाही. आपणच यावर उपाय काढावा.’ तेव्हा गुरुकृपेने अकस्मात् मला चुलत सासर्यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी सर्व विचारपूस करून लगेच ७० सहस्र रुपये पाठवले. दोन मासांनी माझे मुदतठेवीचे पैसेही मला मिळाले.
६. घरून साधनेला विरोध होणे आणि सेवा करतांना त्रास झाल्यावर ‘गुरुदेव देवाण-घेवाण पूर्ण करत आहेत’, असा भाव ठेवल्याने त्रास सहन करण्यासाठी शक्ती मिळणे
मी घराबाहेर जाऊन सेवा करण्यास आरंभ केला. त्यामुळे मला अधिक आनंद जाणवू लागला. सेवेतील आनंदामुळे मला घरच्या त्रासांची जाणीव रहात नव्हती. मी घरची कामे आधी आटोपून सेवेला जाऊ लागले. सेवेला जातांना मी गुरुदेवांना सतत प्रार्थना करायचे, ‘हे गुरुदेवा, यजमान कामावरून परत यायच्या आत माझ्याकडून परिपूर्ण सेवा करवून घ्या.’ कधीकधी मी बाहेर जाण्याचे कारण त्यांना कळल्यास आमच्यात वाद होत असत; परंतु ‘यातून गुरुदेव माझा घेवाण-देवाण हिशोब पूर्ण करत आहेत’, असा भाव ठेवून मी त्रास सहन करत असे.
७. कौटुंबिक अडचणीत वाढ होऊनही गुरुदेवांनी क्षेमकुशल पाहून कशाचीच कमतरता भासू न देणे आणि कठीण परिस्थितीतही स्थिर राहून सेवा करता येणे
दोन वर्षांपूर्वी माझा मोठा मुलगा विजेचा झटका लागून मरण पावला. मुलीच्या सासरीही वाईट घटना घडली. त्यामुळे मुलगीही तिच्या बाळासह माझ्याकडेच रहाते. आता माझे यजमान निवृत्त झाले आहेत आणि त्यांची स्थिती फारच ढासळली आहे. असे असतांना केवळ गुरुदेवच आमचे क्षेमकुशल पहातात. आम्हाला कशाचीही न्यूनता भासत नाही. मला आता सेवेला जायला यजमान विरोध करत नाहीत; कारण एवढ्या कठीण परिस्थितीत केवळ साधना आणि परात्पर गुरुदेव यांच्या कृपेमळेच आम्ही स्थिर राहू शकलो. यासाठी त्यांचे चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
८. सेवेतील तळमळीमुळे सेवा करतांना संपर्कातील व्यक्तीवर प्रभाव पडणे
माझे व्यावहारिक शिक्षण अल्प आहे; परंतु सेवेतील तळमळ या एकाच ओढीमुळे मला गुरुदेवांनी भरपूर दिले. मला अर्पणाची सेवा, सनातन पंचांग वितरण, हिंदी ‘सनातन प्रभात’ पाक्षिक वितरण इत्यादी दिलेल्या सेवांमुळे माझी समाजात वेगळी ओळख गुरुदेवांनी करवून दिली. माझ्याकडे धान्य बाजारातील मोठमोठ्या व्यापार्यांचे हिंदी ‘सनातन प्रभात’ पाक्षिकाचे वितरण आहे. ते व्यापारी माझ्या चांगल्या ओळखीचे झाले आहेत. नूतनीकरण, अर्पण या सेवा करतांना मला ते लोक कधीच ताटकळत न ठेवता माझे स्वागत करतात. ते म्हणतात, ‘‘या सनातनच्या ताई आल्या आहेत. त्यांना चहा-नाश्ता द्या.’’
९. आत्मनिवेदन
‘हे विश्वचालक भगवंता, मी असे काय केले रे की, तू माझी पावलोपावली काळजी घेतोस ? केवळ तुझ्या कृपेमुळेच मी साधनेत टिकून आहे. त्यातील आनंदामुळे माझ्या आनंदात वाढच होत रहाते. मी साधनेत नसते, तर आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते. एवढ्या कठीण परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढले. हे ऋण माझ्याकडून कसे फेडले जाणार भगवंता ? त्यासाठी मला सतत साधनेत आणि तुम्हाला अपेक्षित अशा सेवेत रहाता येऊ द्या, भगवंता. माझ्यावर एवढी कृपा करा. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. कमल रोठे, अकोला (१०.२.२०२२)
वैयक्तिक कामाला गेल्यावर गुरुकृपेने ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा होणे आणि त्यातून आनंद मिळणे‘३०.११.२०२१ या दिवशी मी माझ्या शेतीच्या कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले होते. तेव्हा माझ्या समवेत सनातन पंचांग, लहान आणि मोठे ग्रंथ होते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘माझ्याकडून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची सेवा आपणच करवून घ्या. माझ्याकडील ग्रंथ आणि पंचांग यांचे चैतन्य कार्यालयात पसरू दे’, अशी प्रार्थना करत होते. मी तेथील साहेबांना पंचांग दाखवल्यावर ते त्यांना आवडले आणि ते त्यांनी ठेवून घेतले. त्यानंतर मी लहान आणि मोठे ग्रंथ त्यांना दाखवले. ‘माझ्याकडून ग्रंथांचे वाचन होत नाही’, असे त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना ‘आपत्कालीन परिस्थितीमध्ये करावयाची सिद्धता’, हा ग्रंथ दाखवला. तो ग्रंथ पाहून ते साहेब इतके प्रभावित झाले की, त्यांनी अन्य एका साहेबांनाही ग्रंथ घ्यायला सांगितले. त्यांनी आवडीने ग्रंथ आणि पंचांग घेतले. – सौ. कमल रोठे, अकोला (१०.२.२०२२) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |