रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात ‘साधना शिबिरा’स आरंभ
रामनाथी (फोंडा, गोवा) – प्रारब्धभोग भोगून ईश्वरप्राप्ती करणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे; परंतु मनुष्यजन्माचे खरे ध्येय ठाऊक नसल्याने साधनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात भौतिक गोष्टींमुळे मिळणारे सुख हे तात्कालिक असते, तर चिरंतन टिकणारे सर्वोच्च सुख म्हणजेच आनंद हा केवळ साधना केल्यामुळे मिळतो. त्यामुळे आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे हिंदु जनजागृती समितीचे नांदेड जिल्हा समन्वयक श्री. वैभव आफळे यांनी केले.
येथील सनातनच्या आश्रमात २ डिसेंबरपासून ३ दिवसांच्या ‘साधना शिबिर’ला आरंभ झाला आहे. या शिबिरात ते बोलत होते.
‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि ठाणे येथील डॉ. नितीन भट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला आरंभ झाला. या शिबिरात गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील जिज्ञासू सहभागी झाले आहेत.