हिंदु देवस्थान भूमी घोटाळ्यात मला राजकीय षड्यंत्रातून गोवण्याचा प्रयत्न ! – सुरेश धस, आमदार, भाजप

सुरेश धस, आमदार, भाजप

बीड – बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंदु देवस्थान भूमी घोटाळ्यात माझा आणि माझ्या कुटुंबाचा कसलाही संबंध नाही. राजकीय षड्यंत्रातून मला गोवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मी कोणत्याही अन्वेषणास सिद्ध आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

आमदार सुरेश धस पुढे म्हणाले, ‘‘निराधार तक्रारीतील वाक्यरचनेमुळे माझ्यावर गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. मी जुन्या पक्षात काम करत असतांना राज्य आणि जिल्हा स्तरावरील लोकांचे हे राजकीय षड्यंत्र आहे. लवकरच ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होणार आहे. लोकसेवकाच्या विरोधात जर तक्रार आली, तर त्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची अनुमती आवश्यक असते; पण तशी अनुमती घेतली गेली नाही. जर असे घडत असेल, तर कोणत्याही लोकसेवकावर असे गुन्हे नोंद होऊ शकतील.’’