विपरीत परिणाम करणार्‍या औषधांचे समाजात झालेले वितरण थांबवण्याची यंत्रणाच प्रशासनाकडे उपलब्ध नाही !

मुंबई – चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात एका रुग्णाला ‘ओरोफेर’ या इंजेक्शनची तीव्र प्रतिक्रिया (अ‍ॅलर्जी) झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्य एका रुग्णावरही अशाच पद्धतीची प्रतिक्रिया झाली; पण त्याच्या जिवावर बेतले नाही. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. रुग्णालयाकडील साठ्यातील नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले. याच औषधाच्या पुण्यात झालेल्या साठ्याचेही नमुने पाठवण्यात आले. रासायनिक विश्‍लेषणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यानंतर ‘ईमक्युअर फार्मास्युटिकल्स’ आस्थापनाला याविषयी तात्काळ कळवून हा साठा थांबवण्यास सांगण्यात आले; पण हा साठा देशभर वितरित झाला असून तो थांबवण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी यंत्रणा नाही.

संबंधित अधिकार्‍यांनी मान्य केले आहे की, एखादे औषध घातक ठरले, तर त्याचा पुरवठा आणि वितरीत केलेले औषध तात्काळ थांबवण्याच्या प्रक्रियेवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्यात पालट व्हायला हवा. (हा पालट कधी करणार, याविषयीही प्रशासनाने तातडीने ठरवायला हवे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • अशाने रुग्णाच्या जिवावर बेतले, तर त्याला उत्तरदायी कोण ?
  • अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार !