नवी मुंबई – शहरातील कांदळवन तोडून तेथे अतिक्रमण केले जात असल्याने याला आळा घालण्यासाठी वन विभागाने कांदळवन क्षेत्रात १११ सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नवी मुंबईचे कांदळवन संधारण वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी दिली.
१. भूमाफियांकडून खाडीतील कांदळवनावर अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. परिणामी जैवविविधता नष्ट होत आहे. या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी शासनाने कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६ संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प ३ टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. भिवंडी, पश्चिम आणि मध्य मुंबई, तसेच नवी मुंबई आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य यांचा यात समावेश आहे.
२. वाशी खाडीत राखीव कांदळवनात, तसेच सिडकोच्या जागेत भराव टाकून तेथील कांदळवन नष्ट करून अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. ३.८८ हेक्टर क्षेत्रावरील १७ सहस्र २४२ कांदळवन वृक्ष तोडण्यात आले होते.
३. वन विभाग, सिडको आणि महापालिका यांनी संयुक्तपणे ३५४ झोपड्यांवर कारवाई केली आहे. यात १०३ झोपड्या अधीसूचित कांदळवनात होत्या. त्यावर वन विभागाने स्वतंत्र कारवाई करून १० जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. सलग ४ दिवस ही कारवाई करून येथील झोपड्या तोडून नाल्यांचे प्रवाह पूर्ववत् करण्यात आले आहेत.