बिहारमध्ये ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍याला पंचायतीकडून ५ उठाबशांची शिक्षा !

बिहारमधील जंगलराज !

प्रतिकात्मक छायाचित्र

पाटलीपुत्र (बिहार) – एका ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला गावातील पंचायतीने अवघ्या ५ उठाबशांची शिक्षा देऊन सोडले. या शिक्षेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यावर संबंधितांवर चौफेर टीका होऊ लागली. त्यामुळे बलात्कारी व्यक्तीवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. वस्तूत: भारतात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यांवर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत खटला चालवला जातो. त्यामध्ये जन्मठेपेची तरतूदही आहे.

१. नवादा जिल्ह्यातील अकबरपूर तालुक्यात असलेल्या कनौज गावात २१ नोव्हेंबर या दिवशी बलात्काराची घटना घडली. अरुण पंडित असे आरोपीचे नाव असून त्याचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. आरोपीने पीडित मुलीला आमीष दाखवून कुक्कुटपालनाच्या शेडमध्येच तिच्यावर बलात्कार केला.

२. मुलीने घरी जाऊन पालकांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यासाठी धाव घेतली असता हे प्रकरण गावातच दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. यामागे एक माजी सरपंच असल्याचे सांगण्यात येत आहे.