प्रेमळ आणि देवाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. दूर्वा गौरांग आगाशे (वय ६ वर्षे

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. दूर्वा गौरांग आगाशे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तीव्र त्रासांमुळे तिची पातळी तेवढीच राहिली आहे. तिच्यावर नियमितपणे उपाय आणि योग्य संस्कार केल्यास तिचे स्वभावदोष अन् तिच्यावर आवरण असल्यास ते न्यून होईल अन् तिची पातळी पुन्हा वाढेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१७.१०.२०२२)  

कु. दूर्वा गौरांग आगाशे

१. प्रेमभाव

अ. ‘चि. दूर्वा मला घरकामात साहाय्य करते. तिला कपड्यांच्या घड्या घालणे, भाजी चिरून देणे, केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे हे सर्व करायला आवडते.

आ. घरी कुणी रुग्णाईत असल्यास दूर्वा त्यांना सरबत करून देते आणि त्यांची काळजी घेते. ती तिच्या आजीच्या डोळ्यांत आठवणीने औषध घालते.

इ. प्रतिदिन आमच्या दारी गाय येते. दूर्वा तिला खायला आणि पाणी देते. ती गायीवरून अतिशय भावपूर्णपणे हात फिरवते.

२. शिकण्याची वृत्ती

तिला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. ती ‘एखादी गोष्ट का आणि कशी करायची ?’, असे विचारते. गेले दीड वर्ष ती भरतनाट्यम् शिकायला जाते. तिथे शिकवलेल्या मुद्रा इत्यादी ती आवडीने आणि सहजपणे करते. तिला वेगवेगळ्या भाषा विशेषतः संस्कृत भाषा शिकायला आवडते. तिला चित्रे काढायलाही आवडतात.

३. चांगली स्मरणशक्ती

दूर्वाची स्मरणशक्ती चांगली आहे. तिला ३ – ४ वर्षांपूर्वीचे प्रसंगही आठवतात, तसेच तिला अनेक संस्कृत श्लोकही पाठ आहेत.

४. देवाची आवड

अ. दूर्वाचा मामा (श्री. अवधूत मुळ्ये, वय २८ वर्षे) घरी देवतांची पूजा करतो. त्या वेळी दूर्वा मामासमवेत पूजेतील सर्व कृती अतिशय भावपूर्ण करते.

आ. ती एकटी खेळतांना अनेक वेळा श्रीकृष्णाचे चित्र पाटावर ठेवते. ती श्रीकृष्णाला घरातील एखाद्या पदार्थाचा नैवेद्य दाखवते. ती या गोष्टी भावपूर्ण करते.

इ. काही वेळा दूर्वा श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या कथा स्वतःलाच सांगत असते. तिला देवतांच्या बर्‍याच गोष्टी पाठ आहेत.

ई. दूर्वा प्रतिदिन सर्व स्तोत्रे म्हणते. तिला पुष्कळ स्तोत्रे पाठ आहेत.

उ. दूर्वा रांगोळी चांगली काढते. तिला हार आणि गजरे करून ते देवाला घालायला आवडतात.

५. मी दूर्वाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दैवी बालकांविषयीचे लेख वाचून दाखवत असतांना ती ते लक्षपूर्वक ऐकते.

६. ती वहीत नामजप लिहिते आणि नामजपादी उपाय करत असतांना गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची आठवण काढते.

७. ती तिच्या चुका वहीत लिहिण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःतील दोष सांगण्याचा प्रयत्न करते.

८. दूर्वाला होणारा त्रास

समाजातील कार्यक्रमाला किंवा कुणाच्या वाढदिवसाला जाऊन घरी आल्यावर तिला आध्यात्मिक त्रास होतो. ती पुष्कळ रडते आणि चिडचिड करते. तिची दृष्ट काढल्यानंतर ती रडायची थांबते.

९. स्वभावदोष

हट्टीपणा, चिडचिड करणे आणि ऐकण्याची वृत्ती नसणे.

सौ. दीप्ती गौरांग आगाशे

– सौ. दीप्ती गौरांग आगाशे (कु. दूर्वाची आई), रत्नागिरी (५.५.२०२२) 

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.