२१.११.२०२२ (कार्तिक कृष्ण द्वादशी) या दिवशी श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६१ वर्षे) यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत रहाणार्या साधिका आणि सौ. मनीषा वाघमारे यांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्रीमती मनीषा गाडगीळ यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. प्रेमभाव : ‘श्रीमती मनीषा गाडगीळकाकूंमध्ये असणारा प्रेमभाव त्यांचे सहज बोलणे आणि कृती यांतून व्यक्त होतो. आध्यात्मिक त्रासामुळे माझा काही गोष्टी करण्यासाठी संघर्ष होत असल्यास काकू मला योग्य कृती करण्याचे महत्त्व प्रेमाने समजावून सांगतात आणि प्रोत्साहन देतात. त्या कुठे बाहेर गेल्या, तर आठवणीने माझ्यासाठी खाऊ आणतात.
१ आ. सेवेची तळमळ : काकूंना कंबरदुखीचा तीव्र त्रास आहे. असे असूनही त्या शारीरिक सेवा करतात. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला एवढा त्रास होतो, तरी तुम्ही शारीरिक सेवा का करता ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला देह गुरुकार्यासाठी झिजवायचा आहे.’’
१ इ. सतत कृतज्ञताभावात रहाणे : काहीही चांगले झाले, मग ते स्वतःच्या बाबतीत असो किंवा इतरांच्या, काकू लगेच कृतज्ञता व्यक्त करतात. प्रत्येक वेळी कृतज्ञता व्यक्त करतांना त्या मनापासून करतात. त्यामुळे इतरांनाही त्यांच्यातील भाव जाणवतो. त्यांच्यातील भाव त्यांच्या कृतींमधूनही व्यक्त होतो. ‘गुरुदेव आपल्यासाठी इतके करतात, तर मी एवढे तरी केलेच पाहिजे’, असे त्या नेहमी म्हणतात.
‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळे मला मनीषाकाकूंचा सहवास लाभला. त्यांचे गुण आपणच माझ्या लक्षात आणून दिलेत. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. त्यांचे गुण मला आत्मसात करता येऊ देत, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
२. श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. कृतज्ञताभावात आणि शिकण्याच्या स्थितीत असणे : काकू सतत कृतज्ञताभावात आणि शिकण्याच्या स्थितीत असतात. ‘मी साधनेचे प्रयत्न कसे करू ?’, असे त्या मला विचारतात आणि त्या ‘मला माझ्या चुका सांगा’, असेही सांगतात.
२ आ. इतरांचा विचार असणे
२ आ १. आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी साहाय्य करणे : ‘श्रीमती मनीषाकाकू गेले ४ – ५ मास आमच्या खोलीत निवासाला आहेत. खोलीमध्ये तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या २ साधिका आहेत. काकू खोलीत निवासाला येण्यापूर्वी मला रात्री कधीच वेळेवर झोप लागत नसे. मध्यरात्री १ ते २ नंतर झोप लागायची. ‘मी वेळेत झोपत नाही’, हे काकूंच्या लक्षात आल्यावर त्या मला भाववृद्धी होण्यासाठी प्रयत्न करायला सांगायच्या. त्या त्यांच्या आई सनातनच्या पहिल्या संत प.पू. कै. (श्रीमती) विमल फडकेआजी यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत झालेले प्रसंग सांगायच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करायच्या. तेव्हापासून आता मला लवकर झोप लागते. मी जोपर्यंत झोपत नाही, तोपर्यंत काकूही झोपत नाहीत. त्या मला नेहमी म्हणतात, ‘‘तुम्ही झोपलात की, मला समाधान वाटते आणि मला शांत झोप लागते.’’
२ आ २. त्रासावर आणि स्वभावदोषांवर सकारात्मकतेने प्रयत्न करण्यास सांगणे : ‘मी त्रासांतून लवकर बाहेर पडावे’, असे काकूंना नेहमी वाटते. त्यामुळे ‘मी दिवसभरात आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी काय प्रयत्न केले ?’, याविषयी त्या रात्री मला विचारतात आणि ‘सकारात्मक कसे रहायचे ?’, हे मला सांगतात. माझा त्रास वाढला किंवा विचार वाढले की, त्यांना लगेच कळते. लगेच त्या मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्मरण आणि प्रार्थना करा’, असे सांगतात. त्या माझी आईच्या मायेने काळजी घेतात.’
३. सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. साधकांविषयी प्रीती : ‘मी गावाहून आल्यावर त्यांनी स्वतःहून माझी विचारपूस केली. मी त्यांच्याशी कधी स्वतःहून बोलत नाही, तरी त्यांच्या बोलण्यातून मला ‘त्यांना किती आपुलकी आहे’, हे जाणवले. त्यांना ‘मी बरी आहे’, असे म्हटल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही दोघे आनंदी दिसत आहात. तुम्ही आनंदी आहात, हे पाहून मला पुष्कळ आनंद वाटला.’’ तेव्हा ‘इतरांच्या आनंदाचाच त्यांना किती आनंद वाटतो’, हे जाणून त्यांची निरपेक्ष प्रीती माझ्या लक्षात आली.’
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |