दौंड (पुणे) येथे नितेश राणे यांच्या नेतृत्वात हिंदु जनआक्रोश आंदोलन !

दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह ७ धर्मांधांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंद केल्याचे प्रकरण

भाजपचे आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदु जनआक्रोश आंदोलन

दौंड (जिल्हा पुणे) – येथील कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबर या दिवशी जिहादी मानसिकता असणार्‍या रशीद शेख आणि इलियास शेख यांनी हिंदु मुलीची भर रस्त्यात छेड काढली अन् मुलीचा भाऊ याविषयी जाब विचारण्यासाठी गेला असता, याचा राग मनात धरून ५० ते ६० च्या समुहाने त्या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून प्राणघातक आक्रमण केले. त्यानंतर घर आणि गाडी यांची हानी केली. याविषयी पीडित मुलगी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली असता पोलिसांनी कोणतीही तक्रार घेतली नाही. (अशा पोलिसांवरच कारवाई करायला हवी, असेच जनतेला वाटते ! – संपादक) त्यानंतर केंद्रीय आयोगाने दखल घेतल्यानंतर दौंड पोलिसांनी या प्रकरणी बादशाह शेख याच्यासह ७ धर्मांधांविरोधात मारहाण, तसेच विनयभंगाचा गुन्हा नोंद केला; परंतु गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक केली नसून हे एक मोठे षड्यंत्र आहे. बादशाह शेख मोठ्या संख्येने रोहिंग्या मुसलमानांना शहरात वसवून हिंदूंना त्रास देत आहेत. येथील महिला आणि मुली यांना हे जिहादी सातत्याने त्रास देत आहेत. त्यासाठी १७ नोव्हेंबर या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपचे आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात दौंड पोलीस ठाण्यासमोर हिंदु जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी ८०० ते १ सहस्र हिंदुत्वनिष्ठ  उपस्थित होते, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना, तालीम, मंडळे आणि अखिल भारतीय खाटिक समाज यामध्ये सहभागी झाला होता.

बादशहा शेख हा सलग २९ वर्षे नगरसेवक होता आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दौंड नगरपालिकेतील गटनेता आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे. दीड दशकापूर्वी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तत्कालीन प्रांताधिकार्‍यांनी नामंजूर केला होता.

असे वातावरण महाराष्ट्रात असल्यास छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का ? – नितेश राणे, आमदार, भाजप

नितेश राणे पुढे म्हणाले की, या जिहादी समाजातील व्यक्ती आपल्या हिंदूंच्या दारात येऊन त्यांनी आपल्या हिंदु बहिणीची छेड काढली आहे. वेळेत उपाय केला नाही, तर उद्या तुमच्या घरात येऊन तुमच्या बहिणीचीही छेड काढतील. असे वातावरण आपल्या महाराष्ट्रात असेल, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार आहे का ? हिंदु म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. आमची लढाई एका बादशाहाविरुद्ध नसून या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. किती दिवस आपण या भीतीच्या छायेखाली रहाणार आहोत ? हिंदु समाजाने जागृत व्हावे !

४८ घंट्यांमध्ये बादशहाला अटक करा, नाहीतर महाराष्ट्र शासन काय करू शकते, हे मी तुम्हाला दाखवून देईन. पोलिसांनी पोलिसांचे काम करावे, तुम्हाला कोणतेही संरक्षण द्यायचे असेल, तर आम्ही त्यांना संरक्षण द्यायला सिद्ध आहोत. यानंतर दौंड शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये. त्याचसमवेत आपल्या माता आणि भगिनींकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये, असे वातावरण दौंड शहरामध्ये राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.