आळंदी यात्रेच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ३०० बसगाड्यांचे नियोजन !

पुणे – कार्तिकी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथे येणार्‍या भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळे वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पी.एम्.पी.कडून (पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून) ३०० बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आळंदी यात्रेसाठी १७ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत मार्गावरील नियमित ९७ आणि अधिकच्या २०३ अशा मिळून ३०० बसगाड्या आळंदीसाठी शहराच्या विविध भागांतून सेवा पुरवतील. तसेच १९ ते २२ नोव्हेंबर या ४ दिवसांत आवश्यकतेनुसार रात्रीही बससेवा पुरवण्यात येईल. यासह पी.एम्.पी.ने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले आहे. त्यामुळे या बसगाड्या काटेवस्ती येथून संचलन करतील, असे पी.एम्.पी. प्रशासनाने सांगितले. यात्रेसाठी देण्यात येणार्‍या जादा बससेवेसाठीचे तिकीट (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरापेक्षा ५ रुपयांनी अधिक असेल. (अन्य धर्मियांच्या यात्रेकरूंसाठी पी.एम्.पी.ने अशी सोय केली असता त्यांच्याकडूनही तिकिट दरापेक्षा अधिक पैसे घेतले असते का ? – संपादक)  तसेच पी.एम्.पी.कडून देण्यात येणार्‍या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक आणि इतर पासधारकाला यात्रा कालावधीत रात्रीच्या प्रवासासाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही, असे पी.एम्.पी. प्रशासनाने सांगितले.