कोल्हापूर – गायरान भूमीवरील अतिक्रमण काढून घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. व्यक्तिगत कामासाठी गायरान वापरू नये, असा कायदा आहे; मात्र महाविकास आघाडीतील नेते ही अतिक्रमणे काढू देणार नसल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय असतांनाही गायरान भूमीवरील अतिक्रमण काढू न देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या प्रकरणासाठी कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘कायद्यामध्ये पालट करण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतील. सरकार या संदर्भात पुनर्विचार याचिका प्रविष्ट करेल.’’
न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई होणार असली, तरी त्यामुळे जिल्ह्यातील सव्वा लाखांहून अधिक अतिक्रमणे निघणार असून ६ लाख नागरिक बेघर होणार आहेत. त्यामुळे हक्काचा निवारा नाहिसा होणार आहे, असे मोर्चेकर्यांचे म्हणणे आहे. |