मुंबई, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – रायगड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला अनुमती न मिळाल्यास राज्य आपत्ती निवारण पथक उभारण्यास महाराष्ट्र शासन सिद्ध आहे. यासाठीचा आराखडा राज्यशासनाकडून सिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती निवारण पथकाकडून देण्यात आली.
रायगड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचा एक गट कार्यरत असणार आहे. एका गटामध्ये श्रेणी १ ते ३ चे ४५ जवान असतात. सध्या कोकणामध्ये चक्रीवादळ, पूर, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मुंबईहून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एन्.डी.आर्.एफ्.) जवान साहाय्यासाठी येतात. साहाय्याला विलंब झाल्यास मनुष्यहानीमध्ये वाढ होऊ शकते. महाराष्ट्र शासनाकडून वर्ष २०२० मध्ये केंद्रीय गृहविभागाकडे यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; मात्र केंद्र सरकारकडून अद्याप निर्णय आलेला नाही. हे पथक उभारण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून २ एकर भूमी संबंधित विभागाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.