नाशिक येथील आयुर्वेदिक महाविद्यालये अनुमतीच्या प्रतीक्षेत !

आयोगाकडील सुनावणीस ७ दिवस उलटले !

नाशिक – भारतीय चिकित्सा पद्धती केंद्रीय आयोगाने (एम्.सी.आय.एस्.एम्.ने) ऐन प्रवेशाच्या कालावधीतच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांची पडताळणी करून पुरेसे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुविधा नसल्याने यंदाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर बंदी घातली होती. त्यावर १ नोव्हेंबर या दिवशी आयोगाकडे सुनावणीही झाली; पण अद्यापही त्यावर कुठलाच निर्णय झालेला नाही.

भारतीय चिकित्सा पद्धती केंद्रीय आयोगाच्या अटी-शर्तीनुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्राध्यापक गुणोत्तर, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रमाण, प्राण्यांवर संशोधन करण्यासाठी ‘ॲनिमल हाऊस’, तसेच सुसज्ज इमारत अशा गोष्टींची उपलब्धता नसलेल्या राज्यातील मुंबई, जळगाव, नांदेड, नागपूर आणि धाराशिव अशा ५ आयुर्वेदिक महाविद्यालयांचे प्रवेश बंद केले आहेत. त्यावर राज्याच्या आयुष विभागाच्या संचालकांनी आयोगाच्या अध्यक्षांनाच पत्र लिहून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व गोष्टींची उपलब्धता करून देण्याची ग्वाही दिली.