नागपूर येथील ३ मोठ्या व्यावसायिक समूहांवर आयकर विभागाची धाड !

नागपूर – करचोरीच्या संशयावरून आयकर विभागाने शहरातील ३ मोठ्या व्यावसायिक समूहांवर ३ नोव्हेंबर या दिवशी धाड टाकली आहे. कारवाईच्या दुसर्‍या दिवशी याच पथकाने विविध ठिकाणांहून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि दागिने जप्त केले आहेत, तर काही ठिकाणी मारलेल्या धाडीत पथकाच्या हाती काहीही लागले नाही. या कारवाईविषयी आयकर विभागाच्या वतीने अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे.

नंदुरबार आणि लखनऊ येथील आयकर विभागाचे पथक येथील आयकर विभागातील अधिकार्‍यांनासमवेत घेऊन ही कारवाई करत आहेत. या संयुक्त पथकामध्ये जवळपास १५० अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत. आयकर पथकाने दंतमंजन निर्मिती आस्थापन ‘विठोबा’ इंडस्ट्रीज प्रा.लि., टिळकनगर येथील आयटी क्षेत्रातील ‘पिनॅकल टेलिसर्व्हिसेस आस्थापन’ आणि किराणा वस्तूंचा व्यवसाय करणारी ‘मगनलाल हिरामल फर्म’ यांच्या ठिकाणांवर धाड टाकून कारवाई केली आहे.

नागपूर येथे असलेल्या या तिन्ही उद्योगांशी संबंधित अन्य १२ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. सध्या तिन्ही आस्थापनांच्या संबंधित कागदपत्रांची पडताळणी चालू आहे. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध ठिकाणी अधिकार्‍यांनी लेखाजोखाशी संबंधित दस्तावेजांची पडताळणी केली.