हिंदु विधीज्ञ परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी रुपयांहून अधिक रकम वसूल; पण उर्वरित रकमेचे काय ? – अधिवक्ता समीर पटवर्धन

कोल्हापूर महापालिकेतील ७ कोटी रुपयांची थकित तसलमात रक्कम उघडकीस केल्याचे प्रकरण

(वेळोवेळी अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी जी आगाऊ रक्कम घेतली जाते, तिला ‘तसलमात’ म्हणतात)

कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. शिवानंद स्वामी, श्री. बाबासाहेब भोपळे, अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता प्रीती पाटील आणि सौ. राजश्री तिवारी

कोल्हापूर – हिंदु विधीज्ञ परिषदेच्या सदस्यांनी ३ एप्रिल २०१९ या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ७ कोटी १ लाख ५४ सहस्र ८४४ रुपये तसलमात रक्कम थकित असल्याचे पत्रकार परिषद घेऊन घोषित केले होते. यानंतर याविषयी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. या सर्व पाठपुराव्यामुळे १५ जुलै २०२२ पर्यंत ३ कोटी २ लाख ९३ सहस्र रुपये वसूल झाल्याचे समोर आले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी रुपयांहून अधिक रकम वसूल झाली असली, तरी उर्वरित रकमेचे काय ? असा प्रश्‍न हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी ३ नोव्हेंबर या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

या प्रसंगी अधिवक्ता प्रीती पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. बाबासाहेब भोपळे आणि सौ. राजश्री तिवारी उपस्थित होत्या.

पालिकेचा निधी स्वत:च्या कामासाठी वापरणार्‍यांवर फौजदारी गुन्हे का नाही ? अधिवक्ता समीर पटवर्धन पुढे म्हणाले, ‘‘महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या २८ ऑगस्ट २०२० या दिवशीच्या पत्रानुसार तसलमात रक्कम प्रलंबित असणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून प्रत्येक मासाला ५ सहस्र रुपये कपात करण्यास प्रारंभ केला आहे, असे समजले; मात्र ज्यांनी अशा पालिकेच्या रकमा स्वत:च्या कामासाठी वापरल्या आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद न करण्यामागचे कारण काय ? या संदर्भात आम्ही लवकरच महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहोत.’’