पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात घायाळ

अन्य ८ जणही घायाळ, एकाचा मृत्यू !

आक्रमणकर्त्यांपैकी एकाची हत्या !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या पाकमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. वझिराबाद येथे मोर्च्याच्या वेळी दोघांकडून इम्रान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी इम्रान खान कंटेनर ट्रकवर उभे होते. या वेळी खान यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने ते घायाळ झाले. यासह या आक्रमणात अन्यही ९ जण घायाळ झाले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणार्‍यांपैकी एकजण एके-४७ रायफलमधून गोळीबार करत होता. त्याची उपस्थितांकडून हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, तर दुसर्‍याला उपस्थित लोकांनी तात्काळ पकडले. त्याचे नाव नावीद असल्याचे सांगितले जात आहे. त्याने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले, ‘इम्रान खान लोकांची दिशाभूल करत असल्याने त्यांना मी ठार करण्याचा प्रयत्न केला.’ या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

इम्रान खान यांना लाहोर येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. या आक्रमणाविषयी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ‘आम्ही पाकमधील घटनेवर लक्ष ठेवून आहोत’, असे म्हटले आहे.

(Al Jazeera English)

अल्लाने मला जीवनदान दिले ! – इम्रान खान

गोळीबारात घायाळ झाल्यानंतर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, अल्लाने मला जीवनदान दिले आहे. मी माझी लढाई पुन्हा लढणार आहे. याचा सूड निश्‍चित
घेतला जाईल.