कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाच्या मंत्र्याला दिले १० कोटी रुपये ! – सुकेश चंद्रशेखर यांचा दावा

सुकेश चंद्रशेखर

नवी देहली – कारावासात सुरक्षेसाठी आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र यांना १० कोटी रुपये दिल्याचा दावा मंडोली कारावासात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांनी केला. सुकेश चंद्रशेखर यांच्या या दाव्यामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी देहलीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना पत्र लिहून आपचे नेते सत्येंद्र जैन यांना संरक्षण रक्कम म्हणून १० कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. नायब राज्यपालांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत त्याचे अन्वेषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्येंद्र जैन ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणी (काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रकरणी) सध्या तिहारच्या कारावासात आहेत.

याविषयी मिळालेल्या वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखर यांच्या वतीने त्यांच्या अधिवक्त्याने देहलीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी त्यांना अनेकदा जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचे म्हटले आहे. यासह त्यांनी या पत्रात सत्येंद्र जैन यांना ‘प्रोटेक्शन मनी’ दिल्याचे म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी सत्येंद्र जैन यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.