‘शब्दजन्य ज्ञान बुद्धीने ग्रहण करू शकतो; परंतु परात्पर गुरूंची ज्ञानशक्ती बुद्धीअगम्य आहे; म्हणजेच बुद्धीच्या पलीकडे असून ती शब्दातीत कार्य करत आहे.’ – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था, कर्नाटक राज्य. |
१. लोकप्रतिनिधींचे योगदान
अ. एका खासदारांना प्रत्यक्ष संपर्क करून विषय सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मला सनातन संस्थेविषयी माहिती आहे. संस्थेचे कार्य चांगले आहे आणि तिचा प्रसार व्हायला हवा. विशेषतः तुम्ही लहान मुलांना ग्रंथ दाखवा.’’
आ. एका आमदारांना भेटायला जाण्यापूर्वी मी देवाला प्रार्थना केली. त्यांना विषय सांगितल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘या ग्रंथांच्या माध्यमातून धर्माचा विषय समाजापर्यंत पोचायला हवा.’’ त्यांनी महापौर आणि जिल्हाधिकारी अंतर्गत नियोजन समिती यांना सनातनला साहाय्य करण्यासाठी दोन स्वतंत्र पत्रे दिली.
इ. आणखी एका आमदारांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाचा उद्देश सांगितला. तेव्हा त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून ग्रंथांसाठी साहाय्य करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पत्र दिले.
ई. काही लोकप्रतिनिधींना भेटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आमचा निधी आला की, ग्रंथ घेण्याचे नियोजन करू.’’
– श्री. अतुल आर्वेन्ला, नागपूर (२६.१.२०२२)
२. नागपूर येथील साधकांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत सेवा करतांना आलेल्या अनुभूती
- श्री. रवींद्र भोंदेकर, नागपूर
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या निमित्ताने लहान बहिणीला ग्रंथांची माहिती सांगितल्यावर तिने ग्रंथांची मागणी दिली. मला इतरांकडूनही ग्रंथांची मागणी सहजतेने मिळत आहे.’
- श्री. नीरज आवदे, नागपूर
‘आरंभी मला ‘ग्रंथ कोण घेईल ?’, असा नकारात्मक विचार आला होता; पण मी ज्यांना संपर्क केला, त्यांनी ग्रंथांची मागणी दिली. ‘आपण प्रयत्न केल्यावर गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) सर्व काळजी घेतात’, अशी मला अनुभूती आली.’
- श्रीमती सुषमा पराते, नागपूर
‘मी आणि सौ. विजया बरडे ग्रंथ वितरण सेवेसाठी सौ. नांदूरकर यांच्याकडे गेलो होतो. तेथे नांदूरकरकाकू आणि अर्धांगवायू झालेले त्यांचे यजमान यांना आम्ही ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी माहिती सांगितली. त्यांनी सर्व ग्रंथ पाहिले. त्यांनी स्वतःसाठी आणि भेट देण्यासाठी काही ग्रंथ घेतले.’
- सौ. विजया बरडे, नागपूर
‘मला ६ ते ७ वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे मी मांडी घालून भूमीवर बसू शकत नव्हते. ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत सेवा करतांना माझी गुडघेदुखी बरी झाली. मी दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत सेवा करूनही मला उत्साह वाटत होता आणि घरची सेवा आनंदाने करता येत होती. या अभियानाला घरोघरी चांगला प्रतिसाद मिळाला.’
|