परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून आत्मनिवेदन करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सायली देशपांडे !

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी स्थुलातून आणि सूक्ष्मातून आत्मनिवेदन करू शकत असल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

कु. सायली देशपांडे

मी : गुरुदेव, मला तुमचे भावसत्संगातून दर्शन होत आहे. हे अतिशय अमूल्य आहे. असे दर्शन प्रत्येकाच्या भाग्यात नसते. ‘प्रतिदिन मला महाविष्णूचे दर्शन होणे’, हे तुमच्यामुळेच शक्य होत आहे. (महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णूचे अवतार असल्याचे सांगितले आहे.’ – संकलक) जे साधक आश्रमात नाहीत किंवा आपल्याला स्थुलातून भेटू शकत नाहीत, ते आपल्याला सूक्ष्मातून आत्मनिवेदन करतात; परंतु आपण आम्हाला एवढे सौभाग्य दिले आहे की, आम्ही आपल्या चरणी स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही आत्मनिवेदन करू शकतो. त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे बालसाधक मला स्थुलातून आणि सूक्ष्मातून दोन्ही प्रकारे भेटू शकतात. अन्य साधकांना स्थुलातून भेटण्याची इच्छा असते; मात्र हिला सूक्ष्मातूनही भेटायचे आहे. शाब्बास !

२. एका महिला संतांनी मिठी मारल्यावर आईलाच भेटल्याचा आनंद होणे आणि भाव जागृत होणे

प्रथम ‘मी एका महिला संतांजवळ कशी जाऊ ?’, असे मला थोडेसे अवघडल्यासारखे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात त्यांच्याजवळ गेल्यावर मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘त्यांना मला मिठीत घ्यायचे आहे’, असे समजल्यावर मला पुष्कळ आनंद होत होता. ‘त्यांना कधी एकदा भेटते ?’, असे मला वाटत होते. सत्संगापूर्वी मी त्या महिला संतांना मिठी मारली. तेव्हा ‘जणूकाही मी माझ्या आईलाच मिठी मारत आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझा भाव जागृत होऊ लागला आणि मला ‘आनंदाच्या उकळ्या फुटतात’, तसे झाले होते. परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच कृपेने मला हे सौभाग्य लाभले.

इथे मला सर्व साधकांकडून पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळत आहेत. जी सेवा मी कधीच केली नाही, ती सेवा मला इथे येऊन शिकायला आणि करायला मिळत आहे. त्यातून मला तुमची प्रीती पुष्कळ प्रमाणात अनुभवता येत आहे. तुम्ही माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहात. त्याबद्दल मी तुमच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.’ – कु. सायली देशपांडे (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

दैवी बालकांच्या सत्संगात श्री गणेशाचे अस्तित्व आणि आवाज अनुभवणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास देशपांडे !

कु. श्रीनिवास देशपांडे

३१.८.२०२२ या दिवशी श्री गणेशचतुर्थी होती. त्या दिवशी दुपारी झालेल्या दैवी बालकांच्या सत्संगात श्री गणेशाशी संबंधित भावप्रयोग करून घेतला. भावप्रयोग घेणार्‍या साधिकेने सांगितल्याप्रमाणे मी श्री गणेशाला अनुभवण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या वेळी मला एक वेगळा आवाज ऐकू येऊन माझे लक्ष त्याकडे वेधले गेले. कुणीतरी मला विचारत होते, ‘कसा आहेस ?’ तेव्हा मला प्रश्न पडला, ‘हा आवाज कुणाचा आहे ? भावप्रयोग चालू असतांना कुणी बोलत नाही.’ नंतर पुन्हा मला आवाज ऐकू आला, ‘अरे बाळा, तू मला ओळखले नाहीस का ? मी श्री गणेश बोलत आहे.’ श्री गणेशाचा भावप्रयोग चालू असतांना मला त्याचाच आवाज ऐकू आल्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मला ‘श्री गणेश माझ्या बाजूला उभा आहे’, असे जाणवून सत्संगातील श्री गणेश तत्त्व पुष्कळ प्रमाणात अनुभवता आले.’

– कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ११ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत