मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

  • महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात (वेबिनारमध्ये) शोधनिबंध सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे आहेत सहलेखक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

फोंडा (गोवा) – प्राचीन काळी मंदिरांमध्ये देवतांसमोर कलाकारांनी कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येत असे आणि त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती. मंदिरांमध्ये सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते, असा संशोधनाद्वारे काढण्यात आलेला निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी मांडला. प्रसिद्ध इंडोलॉजिस्ट आणि नवी देहली येथील भारतीय विद्या भवनच्या ‘के.एम्. मुन्शी सेंटर’चे अधिष्ठाता डॉ. शशी बाला यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात (वेबिनार) ते बोलत होते.

‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या उत्पत्तीमध्ये भारतीय मंदिरांचे महत्त्व’, या विषयावर शोधनिबंध श्री. शॉन क्लार्क आणि त्यांच्या पत्नी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी ऑनलाईन सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर  श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की,

१. एका चाचणीत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य विभागातील साधकांनी एका प्राचीन शिवमंदिरात भारतीय शास्त्रीय नृत्य सादर केले. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) वापरून कलाकार, शिवलिंग आणि भगवान शिवाची प्रतिमा यांची प्रभावळ मोजण्यात आली.

२. कार्यक्रम सादर केल्यानंतर या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे आढळले. या वेळी देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित झाल्याने देवतेच्या प्रतिमेच्या प्रभावळीत सर्वाधिक वाढ झाल्याचेही आढळून आले.

प्रतिकात्मक चित्र

३. दुसर्‍या एका चाचणीत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य विभागातील एका साधकाने श्री दुर्गादेवीचे मंदिर, अन्य एक सभागृह, आध्यात्मिक संशोधन केंद्राचा स्टुडिओ, तसेच आश्रम अशा ४ वेगवेगळ्या ठिकाणी एक भजन गायले. या वेळी केलेल्या चाचणीत आश्रम आणि मंदिर येथील सादरीकरणाच्या वेळी गायकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ, तर सभागृहातील सादरकरणाच्या वेळी सकारात्मक प्रभावळ अल्प झाल्याचे आढळले.

४. याचे कारण असे की, मंदिर आणि आश्रम हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि तेथे भजने गायल्याने सकारात्मकता वृद्धिंगत होते, तर प्रेक्षागृहे ही केवळ मनोरंजनासाठी वापरली जातात.