लाहोरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले !

‘घडी चोर’च्या घोषणा

लाहोर (पाकिस्तान) – येथे २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी एका कार्यक्रमाच्या वेळी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले. या वेळी जमावाने खान यांना उद्देशून ‘घडी चोर’च्या घोषणाही दिल्या. या प्रसंगी खान स्वत: जमावाला बाजूला करत होते. त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ते पुष्कळ अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. ही घटना खान त्यांच्या समर्थकांसह लाहोरच्या ‘मस्जिद एक नबवी’ येथे पोचले असता घडली.

पाकच्या निवडणूक आयोगाने खान पंतप्रधान असतांना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची त्यांनी खोटी माहिती पुरवल्याचा ठपका ठेवत एक आठवड्याआधीच त्यांना ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवले आहे. त्यांचे संसद सदस्यत्वही रहित करण्यात आले आहे. शासकीय कोषागारात जमा केलेल्या भेटवस्तू त्यांनी स्वस्तात विकत घेतल्या आणि चढ्या भावात विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामध्ये मौल्यवान घड्याळे आणि भेटवस्तू यांचा समावेश असल्यानेच त्यांना ‘घडी चोर’ म्हणण्यात येत होते.