कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

रशिया-युक्रेन युद्धावर रशियाच्या संरक्षणमंत्र्यांशी केली चर्चा !

नवी देहली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्याशी दूरभाषवर नुकतीच चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करतांना सिंह म्हणाले की, कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये. संघर्ष लवकरात लवकर निवळण्यासाठी चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून पुढे जाणे आवश्यक असल्याच्या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चारही केला. परमाणु अथवा जैविक शस्त्रास्त्रे यांच्या उपयोगाची शक्यता मानवतेच्या मूळ सिद्धांतांच्या विरोधात आहे, असेही सिंह म्हणाले. मुळात रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनीच या चर्चेचे आयोजन केले होते.

१. चर्चेच्या वेळी दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण साहाय्य यांच्यासमवेतच युक्रेनमधील बिघडत्या परिस्थितीवर चर्चा केली. या वेळी शोइगू यांनी सिंह यांना रशियाच्या समस्यांविषयी अवगत केले. दोन्ही मंत्र्यांनी पुढेही चर्चा करत रहाण्याठी संपर्कात रहाण्याचे ठरवले आहे.

२. युक्रेनने साधारण दोन आठवड्यांपूर्वी क्रीमियामध्ये केलेल्या मोठ्या बाँबस्फोटाला उत्तर देत रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यानंतर दोघांमधील संघर्ष वाढला.

३. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परमाणु शस्त्रास्त्रांच्या उपयोगावरून रशियाला चेतावणी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, असे करणे गंभीर चूक होईल आणि रशियाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

४. बायडेन प्रशासनाने याआधी म्हटले होते की, रशियाने याआधी नोटीस दिली आहे की, तो स्वत:च्या परमाणु क्षमतांचा नियमित अभ्यास करण्याचा विचार करत आहे.

भारत-चीन यांच्यातील सामान्य संबंध जागतिक हितामध्ये ! – डॉ. एस्. जयशंकर

डॉ. एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतातील चीनचे राजदूत सुन विडोंग यांची २६ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली. या प्रसंगी डॉ. जयशंकर म्हणाले की, सीमाक्षेत्रामध्ये शांतीव्यवस्था ठेवणे, हे भारत-चीन यांच्यातील सामान्य संबंधांसाठी आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील सामान्य संबंध हे आशिया खंड, तसेच जग यांच्या हितामध्ये आहे.