वसंतकुंज स्मशानभूमीच्या स्थलांतराच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – देहलीतील वसंतकुंज परिसरातील मसूदपूर गावातील १०० वर्षे जुनी स्मशानभूमी किशनगड येथे स्थलांतरित करण्याच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच दक्षिण देहली महानगरपालिकेला या स्मशानभूमीचे एका वर्षाच्या आत विद्युत् स्मशानभूमीत रूपांतर करण्याचे निर्देश दिले. ‘जर प्रत्येक रहिवासी संघटनेने स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर शहराच्या हद्दीत एकही स्मशानभूमी शिल्लक रहाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

१. ‘वसंतकुंज परिसरातील स्मशानभूमी ‘देहली महानगरपालिका कायदा, १९५७’ लागू होण्यापूर्वी अस्तित्वात होती, तर वसंतकुंज निवासी वसाहत वर्ष १९९० मध्ये अस्तित्वात आली’, असे न्यायमूर्ती एम्.आर्. शहा आणि न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश यांच्या खंडपिठाने स्थगिती आदेश देतांना सांगितले.

२. वसंतकुंज रहिवासी कल्याण संघटनेच्या वतीने प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

३. वसंतकुंज रहिवासी कल्याण संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ अधिवक्ता करण सिंग भाटी यांनी युक्तीवाद केला, ‘‘स्मशानभूमी वसंतकुंजच्या निवासी संकुलाजवळ आहे आणि त्यामुळे वसाहतींमधील रहिवाशांना आरोग्यास धोका आहे.’’ यावर महापालिकेच्या अधिवक्त्या वंदना सहगल यांनी ‘या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला आहे’, असा युक्तीवाद केला. अधिवक्त्या सहगल यांनी केलेला युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला.