२०.१०.२०२२ या दिवशीच्या अंकात ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आजच्या भागात धर्माभिमान्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि धर्माभिमान्यांनी दिलेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/621454.html
२. ‘पी.पी.टी.’ दाखवतांना ‘देवाचे कार्य तोच करवून घेतो’, याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती
२ अ. सौ. अनघा जोशी (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर
२ अ १. अधिवेशन काळात ‘पी.पी.टी.’ दाखवण्याची सेवा सलग करत असूनही थकवा न येता आनंद मिळणे आणि ‘सेवेसाठी देवच शक्ती देत आहे’, असे जाणवणे : ‘अधिवेशन काळात आश्रम पहाण्यासाठी प्रतिदिन पुष्कळ धर्माभिमानी येत होते. तेव्हा संगीताच्या सेवेतील साधक त्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवण्याची सेवा करत होते. त्या वेळी साधकसंख्या अल्प असल्यामुळे मोजकेच साधक ‘पी.पी.टी.’ दाखवण्यासाठी होते. त्यामुळे त्या साधकांना दिवसभरात बराच वेळ बोलावे लागत होते. साधकांना नेहमीच्या आश्रमसेवाही असायच्या, तरीही देवाच्या कृपेने साधकांना थकायला होत नव्हते. ‘या सर्व सेवा करण्यासाठी देवच आम्हाला शक्ती देत आहे’, असे आम्हाला जाणवत होते.’
२ आ. कु. मयुरी आगावणे (संगीत अभ्यासक)
१. ‘प्रत्येक दिवशी नवीन पाहुणे आणि साधकांमध्ये नवीन उत्साह पहायला मिळायचा. ‘देवाचे कार्य देवच करून घेतो. आपण निमित्तमात्र असतो’, हे यातून मला शिकायला मिळाले.
२. ‘पी.पी.टी.’ बनवणार्या साधकांनी त्या क्षेत्रातील कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. देवाने त्यांच्याकडून ही सेवा करून घेऊन साधकांना स्वयंपूर्ण बनवले. ‘पी.पी.टी.’ सेवेच्या माध्यमातून देवाने आम्हाला प्रसाराच्या दृष्टीने काळाच्या पुढे एक पाऊल टाकायला शिकवले’, असे मला वाटले.’
२ इ. श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के)
२ इ १. प्रारंभी धर्माभिमान्यांना ‘पी.पी.टी.’तील सूत्रे समजावून सांगतांना भीती वाटणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढणे : ‘मला पुष्कळ लोकांसमोर बोलायची सवय नसल्यामुळे आरंभी ‘पी.पी.टी.’ दाखवतांना मला भीती वाटत होती. यावर उपाय म्हणून ‘दोन साधकांनी थोडा थोडा भाग सांगायचा’, असे ठरले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून सांगायला आरंभ केल्यावर त्यांच्या कृपेने मला योग्य शब्द सुचत होते. त्यामुळे माझ्या मनातील भीती जाऊन आत्मविश्वास वाढला. ‘प्रार्थना केल्यावर देव मार्ग दाखवतो’, हेही मला या अनुभूतीतून शिकता आले.’
२ ई. कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे)
२ ई १. ‘पी.पी.टी.’च्या सेवेत मी सहभागी नसूनही ‘पी.पी.टी.’ दाखवणार्या साधकांचा उत्साह आणि आनंद पाहून मलाही ती सेवा केल्याचा आनंद अनुभवता येणे : ‘पी.पी.टी.’ची सेवा करणारे साधक ‘पी.पी.टी.’च्या सेवेत शिकायला मिळालेली सूत्रे आमच्या दैनंदिन आढाव्यात सांगत असत. त्या सेवेत मी नसूनही त्या साधकांचा उत्साह आणि आनंद पाहून मलाही ती सेवा केल्याचा आनंद अनुभवता येत होता. मला त्या सर्व साधकांकडून शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तळमळ शिकता आली.
२ ई २. साधकांनी सिद्ध केलेली ‘पी.पी.टी.’ पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अफाट दैवी कार्याची प्रचीती येणे : ‘पी.पी.टी.’ बघितल्यावर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य पुष्कळ अफाट आणि दिव्य असून ते माझ्यासारख्या सामान्य साधिकेची बुद्धी अन् कल्पना यांच्या पलीकडचे आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी रुजवलेल्या या बिजाचा आता वृक्ष झाला असून त्याच्या फांद्या सर्वत्र पसरत आहेत. पुढे याचा एक महाकाय वृक्ष होणार आहे’, असे मला वाटले.’
३. संगीतविषयक ‘पी.पी.टी.’ पाहिल्यावर धर्माभिमान्यांनी दिलेले अभिप्राय !
‘अधिवेशनाला आलेले सगळेच धर्माभिमानी संगीतात रुची असणारे असतील’, असे नाही. त्यामुळे ‘त्यांना संगीत हा विषय कितपत आवडेल ?’, असे आम्हाला वाटले होते; परंतु प्रत्यक्षात बर्याच जणांना संगीताची आवड असून व्यवसायामुळे त्यांना संगीताकडे फार लक्ष देता येत नाही, असे आमच्या लक्षात आले.
अ. वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने सूक्ष्म गोष्टींचे केलेले मापन (मोजमाप), शास्त्रीय संगीताचे स्थूल गोष्टींवर दिसून येणारे परिणाम आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या अनुभूती’ हे सर्व पाहून धर्माभिमान्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
आ. सर्वाेच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ अधिवक्ते आले होते. ते स्वतः कथ्थक नृत्य शिकले आहेत. ते अनेक वर्षे नृत्याचा सराव करत होते. त्यांना हे संशोधन पाहून पुष्कळ आनंद झाला. त्यांनी आम्हाला सर्वतोपरी साहाय्य करायची सिद्धता दाखवली.
इ. सध्याच्या काळात लोकांना वैज्ञानिक उपकरणांची भाषा कळते. त्या दृष्टीने केलेले हे संशोधन पाहून काही संतांनी समाधान व्यक्त करून या कार्याला आशीर्वाद दिले.
ई. अनेक धर्माभिमान्यांनी त्यांच्या गावातील ओळखीच्या कलाकारांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्याची माहिती सांगून त्यांनी आम्हाला या संशोधनात साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
उ. काही धर्माभिमान्यांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्ती’ हा विषय ठाऊकच नव्हता. त्यांना त्याविषयी कळल्यावर त्यांच्या मनात संगीताची ओढ निर्माण झाली.
ऊ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात गायन, वादन अन् नृत्य केवळ स्थूल स्तरावर न करता त्याचा अंतर्गत होणार्या परिणामांचा अभ्यास केला जातो. या विषयावरील ‘क्लिप्स’विषयीही बर्याच धर्माभिमान्यांना कुतूहल वाटले. ‘संगीताचा शरीर आणि अंतर्मन यांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास त्यांच्या लक्षात आला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे संगीताविषयी चालू असलेल्या संशोधन कार्याचा धर्माभिमान्यांच्या माध्यमातून व्यापक प्रसार झाला. गुरुमाऊलीनेच आमच्याकडून ही सेवा करून घेतली. त्याबद्दल आम्ही गुरुमाऊलीच्या चरणी शतशः कृतज्ञ आहोत.’
– संगीताशी संबंधित साधक (सर्व सूत्रांचा दिनांक १.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |