‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

(पी.पी.टी.ही एक संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) असून याद्वारे संगणकावर एखाद्या विषयाशी संबंधित विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.)

१२.६.२०२२ ते १८.६.२०२२ या कालावधीत गोवा येथील रामनाथ देवस्थान मंदिराच्या सभागृहात ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ झाले. या अधिवेशनासाठी भारतभरातील अनेक धर्माभिमानी आले होते. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहायला येणार्‍या धर्माभिमान्यांना ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे) संगीतातील संशोधन दाखवण्याचे नियोजन केले होते. आतापर्यंत संगीत संशोधनाच्या अंतर्गत गायन, वादन आणि नृत्य यांचे ७०० हून अधिक प्रयोग करण्यात आले आहेत अन् अजूनही चालू आहेत. संगीताशी संबंधित साधकांनी संगीत संशोधनाची ‘पी.पी.टी.’ बनवण्याची सेवा प्रथमच केली. ही सेवा करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांचा मिळालेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.


१. संगीत संशोधनकार्याची ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याविषयी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांना आलेल्या अनुभूती

१ अ. सौ. अनघा जोशी, (बी.ए. (संगीत), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

सौ. अनघा जोशी

१ अ १. देवाने एका साधिकेच्या माध्यमातून संगीताशी संबंधित संशोधनाचे कार्य ‘पी.पी.टी.’द्वारे हिंदु अधिवेशनाच्या वेळी आश्रम पहायला येणार्‍यांसाठी दाखवण्याविषयी सुचवणे : ‘संगीताशी संबंधित संशोधनाचे वाढते कार्य पाहून एका साधिकेने आम्हाला सुचवले, ‘‘या अधिवेशनाच्या वेळी आश्रम पहायला येणार्‍या धर्माभिमान्यांना तुम्ही संगीतविषयक करत असलेले संशोधनाचे कार्य ‘पी.पी.टी.’द्वारे दाखवू शकता का ?’’ याविषयी आम्ही सेवेशी संबंधित साधकांशी चर्चा करून उत्तरदायी साधकांना विचारले. त्यांनीही त्यासाठी आम्हाला अनुमती दिली. तेव्हा ‘जणू देवानेच त्या साधिकेच्या माध्यमातून संगीताचे कार्य सर्वांसमोर यावे, हे सुचवले’, असे मला वाटले.’

१ आ. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, (संगीत विशारद, संगीत समन्वयक, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

१ आ १. ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्यासाठी रूपरेषेची संकल्पना आपोआप सुचून त्याविषयीची सर्व सूत्रे एकाच बैठकीत लिहून होणे : ‘पी.पी.टी.’मध्ये कोणते घटक आले पाहिजेत’, याचे चिंतन करतांना आपोआप एकाच बैठकीत सर्व सूत्रे (‘स्क्रिप्ट’) लिहून झाली. त्यामुळे ‘देवानेच ही सूत्रे लिहून घेतली’, अशी मला अनुभूती आली.’

१ इ. संगीत विभागातील सर्व साधक

१ इ १. ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याची सेवा प्रथमच करतांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळणे आणि ‘संगीतविषयक संशोधन भारतभरातील धर्माभिमान्यांसमोर जाणार’, याचा आनंद होणे : ‘आम्ही ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याची सेवा प्रथमच करत होतो. त्यासाठीची सूत्रे काढणे, लिखाण सिद्ध करणे, ‘स्लाईड’ बनवणे, ध्वनीचित्र-चकत्या आणि छायाचित्रे यांचे संकलन (व्हिडिओ आणि फोटो एडिटिंग) करणे’ यांसह अनेक नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. हिंदु अधिवेशनासाठी भारतभरातून धर्माभिमानी येणार होते. ‘त्यांच्यापर्यंत संगीतातील संशोधनाचे कार्य पोचणार’, या विचाराने आम्हाला आनंद झाला.’

१ ई. सौ. सावित्री इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका)

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

१ ई १. ‘पी.पी.टी.’ सिद्ध झाल्यावर प्रथम ती पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत) यांनी पाहिली, तेव्हा संतांकडून ‘पी.पी.टी.’चा शुभारंभ झाल्यामुळे कृतज्ञता वाटणे : ‘आमची ‘पी.पी.टी.’ सिद्ध झाली, तेव्हा पू. अशोक पात्रीकरकाका (सनातनचे ४२ वे संत) आमच्या सेवेच्या कक्षात आले होते. आम्ही त्यांना ‘पी.पी.टी.’ पहाण्याविषयी विचारल्यावर त्यांनी होकार दर्शवला. आम्ही त्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवल्यावर त्यांना ती आवडली. तेव्हा ‘पी.पी.टी.’ दाखवण्याचा शुभारंभ संतांच्या हस्ते झाला’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देवाने संतांच्या हस्ते ‘पी.पी.टी.’चे उद्घाटन करून आम्हाला या सेवेसाठी आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.’

(क्रमशः)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक