|
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात खेळाडू कायमस्वरूपी चांगल्याप्रकारे खेळांचा सराव करू शकतील, असे एकही चांगले क्रीडांगण नाही. सांगली शहरातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम’ येथे, तर बहुतांश वेळा पाणी साचलेले असणे, गवत वाढलेले असणे यांसह अन्य समस्या यांमुळे ते बंदच असते, तर छत्रपती शिवाजी स्टेडियमचीही तीच अवस्था असून पाऊस पडला की, तेथे पुष्कळ पाणी साचते अन् त्यामुळे त्याचा उपयोग करता येत नाही. मिरज येथील ‘छत्रपती शिवाजी स्टेडियम’ची यापेक्षा वेगळी अवस्था नसून ‘फुटबॉल’च्या सामन्यांसाठी विशेषत्वाने प्रसिद्ध असलेल्या स्टेडियमचीही ४ कोटी रुपयांचा निधी व्यय करून समस्या ‘जैसे थे’ आहेत. बहुतांश वेळा स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी प्रशासन नेहमीच ‘निधी नाही’, असे उत्तर देते.
सांगलीला शेजारी लागूनच असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम’सारखे राष्ट्रीय पातळीवरील क्रींडागण आहे, तसेच शहरातही अन्य मैदाने चांगली असल्याने येथील खेळाडूंच्या कलागुणांना नेहमीच चांगलाच वाव मिळतो. सांगली-मिरज असलेल्या एकाही क्रीडांगणास ‘इनडोअर’ सभागृह नसल्याने पाऊस येऊन गेल्यावर खेळाडूंना ‘सराव’ बंदच ठेवावा लागतो. मध्यंतरीच्या काळात शिवाजी स्टेडियम येथे भुयारी गटारीचे पाणी साचत होते, तसेच मैदानावर मोठे खड्डे पडले होते. येथील मैदानावर अनेक वेळा मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असते.
प्रसिद्धीमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, तसेच एखाद्या संघटनेने आंदोलनाची चेतावणी दिल्यावर महापालिका प्रशासन गवत काढणे, खड्डे बुजवणे यांसारखी तात्पुरती मलमपट्टी करते आणि परत ‘जैसे थे’ स्थिती येते.
पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था मैदानांमध्ये नाही !मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पाण्याचा निचरा तात्काळ होण्याची व्यवस्था कोणत्याच मैदानांमध्ये नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे, तर पाणी साचल्यावर १५ दिवस त्याचा निचरा होत नाही इतकी वाईट स्थिती आहे. यामुळे तेथे पाणी वाहून जाण्यासाठी तज्ञांना बोलावून ज्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे, त्यातील कोणत्याच गोष्टींकडे महापालिका लक्ष देत नाही. खेळून झाल्यावर स्नान करणे, आवरणे, कपडे-पालटणे, याचसमवेत महिला-युवती यांच्यासाठी वेगळी सोय अशा कोणत्याच विशेष सुविधा मैदानांमध्ये नाहीत. त्यामुळे चांगल्या खेळाडूंना सराव करण्यासाठी कोल्हापूरच्याच मैदानांवर अवलंबून रहावे लागते. येणार्या पिढीला खेळाची आवड निर्माण होण्यासाठी मैदाने चांगली असणे हे आवश्यक असून त्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. |