मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट करणार्‍यावर गुन्हा नोंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी प्रदीप भालेकर यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात २३ ऑक्टोबर या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन गटांत वाद निर्माण करणे आणि सामाजिक शांतता बिघडवणे या उद्देशाने ही विधाने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विविध आरोप करण्यासमवेत ‘त्यांना स्वतःला ठार मारण्याचा कट रचला आहे’, असाही आरोप त्यांनी केला आहे. अन्यही काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येविषयी खळबळजनक विधान या ट्वीटमध्ये केले आहे.

उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांना या आक्षेपार्ह ट्वीटविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चंदनशिवे यांनी समतानगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.वि. कलम १५३(अ)(दोन गटांत शत्रुत्व वाढवणे), १५३(ब) (चिथावणीखोर वक्तव्य करणे), ५०० (बदनामी करणे), ५०४ (प्रक्षोभक विधान करणे), ५०५(२) (सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करणे) या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.