म्यानमारमध्ये सैन्याने कचीन समुदायावर केलेल्या हवाई आक्रमणात ६० पेक्षा अधिक जण ठार

यांगून (म्यानमार) – म्यानमारमधील सैन्याने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ६० जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. कचीन या मूळनिवासी अल्पसंख्य समुदायाच्या प्रमुख राजकीय संघटनेच्या वार्षिकोत्सवासाठी जमलेल्या लोकांवर हे आक्रमण करण्यात आले.  यात ठार झालेल्यांत कार्यक्रमासाठी आलेले गायक, वादक यांचाही समावेश आहे. म्यानमारमधील वाढत्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आग्नेय आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ३ दिवसांनी इंडोनेशियात होणार आहे. त्याआधी हे आक्रमण करण्यात आले. म्यानमारचे लष्कर, तसेच सरकारी वृत्तसंस्था यांनी या आक्रमणाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.

१. म्यानमारमधील मूळनिवासी अल्पसंख्यांक समुदायाकडून गेली अनेक दशके स्वायत्ततेची मागणी केली जात आहे. हा प्रश्‍न जुनाच आहे; मात्र सैन्याने सत्ता हस्तगत केल्यानंतर त्याविरोधात सशस्त्र चळवळ चालू झाल्यानंतर सरकारला होणार्‍या विरोधाला आणखी धार चढली आहे. बंडखोर घटकांत कचीन हे प्रबळ मानले जातात. त्यांच्याकडे शस्त्रनिर्मितीची क्षमता आहे.

२. संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमारमधील कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आक्रमणाच्या वृत्ताची आम्ही नोंद घेतली आहे. नि:शस्त्र नागरिकांवर सुरक्षादलांनी बळाचा अतिरेकी वापर करणे अत्यंत अयोग्य असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.