रशिया-युक्रेन युद्धातील अण्वस्त्र धमकी : जगासाठी धोक्याची घंटा !

एकविसाव्या शतकात वाढत असलेला अणूशस्त्रांचा प्रसार, ही तिसर्‍या महायुद्धाची नांदीच !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिल्यानंतर अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणूबाँबची आठवण होणे अगदी स्वाभाविक आहे. आता पुतीन हे रशियाच्या हितसंबंधांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवण्याची धमकी देत आहेत. युक्रेन युद्धाचा त्यांना समाधानकारक वाटणारा अंत अद्याप दूरच असल्यामुळे ही धमकी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता सर्वांनीच गृहीत धरायला हवी.

१. रशियाने युक्रेनला अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देणे

‘समजा रशियाने अण्वस्त्रांचा वापर केलाच, तर तो युक्रेन नजीकच्या काळ्या समुद्राच्या तळाशी स्फोट घडवून घबराट वाढवण्यापुरता असेल, तसेच हा स्फोट निर्जन ठिकाणीच घडवला जाईल, असा कयास काही तज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे अल्प क्षमतेचे आणि लहान अणूबाँब हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. रशिया कदाचित् अल्प क्षमतेचेही अण्वस्त्र वापरेल आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून ते डागले जाईल. तसे झाल्यास हिरोशिमा शहराच्या एक तृतीयांश संहार होऊ शकतो. अल्प क्षमतेचे अण्वस्त्र मर्यादित प्रदेशाला बेचिराख करू शकते. त्याने तात्काळ प्रचंड हानी होणार नसली, तरी किरणोत्सर्गाचा धोका मात्र संहारक असू शकतो. भूमीवरून सोडली जाणारी ही क्षेपणास्त्रे रशियाच्या भूमीवरूनही युक्रेनमधील लक्ष्यापर्यंत मारा करू शकतात. तरीही प्रत्यक्षात अण्वस्त्रांचा वापर ही रशियाची धमकीच रहाण्याची शक्यता अधिक आहे.

२. अमेरिकेने वर्ष १९७० च्या दशकात लहान आकाराच्या अणुबाँबची निर्मिती करणे

अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात अल्प क्षमतेच्या अण्वस्त्रांची चाचपणी चालू केली होती. अमेरिका किंवा ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) यांच्याकडे वर्ष १९७० च्या दशकात ७ सहस्र ४०० हून अधिक अण्वस्त्रे  होती, तर रशियाकडे त्या वेळी ‘नाटो’हून अल्प अण्वस्त्रे होती. अमेरिकेने वर्ष १९७० च्या दशकात पाठीवर मावेल एवढ्या आकाराचे आणि साधारण ७० पौंड (३१ किलो) वजनाचे अणूबाँब निर्माण केले होते. एखाद्या जीपवरूनही हे बाँब डागता येईल, अशी क्षमता अमेरिकेने सिद्ध ठेवली होती.

३. रशियाचा आण्विक धोका थांबवण्यासाठी जागतिक कारवाईची आवश्यकता !

गेल्या काही आठवड्यांत युक्रेनच्या सैन्याने रशियावर प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात परत मोठ्या प्रमाणावर भूभाग कह्यात घेतला. त्यामुळे रशियाच्या सैन्याला दीर्घकाळ कह्यात असलेल्या अनेक भागांचा ताबा सोडावा लागला आहे. दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या ४ भागांचा ताबा घेतल्याची घोषणा केली आहे. ‘रशियाच्या कह्यात असलेल्या भागांचे रक्षण करण्यासाठी लहान अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो’, असे पुतीन आणि रशियाचे इतर ज्येष्ठ अधिकारी यांनी सुचवले होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की म्हणाले, ‘‘पुतीन त्यांच्या नागरिकांना अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी सिद्ध करत आहेत, हे धोकादायक आहे.’’ यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, ‘‘यामुळे जग निर्णायकीच्या उंबरठ्यावर आले आहे. शीतयुद्धाच्या वेळी क्युबामध्ये जी वेळ आली होती. त्यानंतर आता ही वेळ येऊन ठेपली आहे.’’ झेलेंस्की यांनी ‘रशियाच्या धमक्या या संपूर्ण जगासाठी धोका आहे. रशिया युरोपमधील सर्वांत मोठ्या ‘झापोरीझिया’ या अणुऊर्जा प्रकल्पाला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प रशियात समाविष्ट करण्याचा पुतीन यांचा प्रयत्न आहे’, असा दावा केला आहे. ‘‘जग तात्काळ रशियाच्या व्याप्तीची कृती थांबवू शकते’’, असेही ते म्हणाले.

४. रशियाच्या धमकीमुळे परत एकदा अण्वस्त्रांमुळे निर्माण होणार्‍या असुरक्षिततेचे सूत्र चर्चेला येणे

दुसर्‍या महायुद्धात केवळ अमेरिकेकडेच अण्वस्त्र होती. नंतर अनेक देश अण्वस्त्रधारी बनले. त्यामुळे दहशतीचा समतोल निर्माण झाला. परिणामी अण्वस्त्रधारी देशात प्रत्यक्ष युद्ध होणार नाही, असा सिद्धांत मांडला गेला; परंतु कारगील युद्धाने तो समज खोटा ठरवला. युक्रेनमध्ये युरोपातील सर्वांत मोठा अणुप्रकल्प असूनही रशियाने या देशावर आक्रमण केले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या ७ मासांच्या काळात काही वेळा ‘या युद्धाचे रूपांतर आण्विक युद्धात होते कि काय ?’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘नाटो’ ही सैनिकी संघटना या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाली, तर आम्ही त्याचा प्रतिकार अण्वस्त्रांनी करू’, अशी धमकी रशियाने दिली आहे. वर्ष १९९०-९१ च्या पूर्वी युक्रेन हा सोव्हिएत संघाचा भाग होता. तेव्हा रशियाचे अनेक आण्विक प्रकल्प युक्रेनमध्ये होते. तसेच रशियाची काही अण्वस्त्रेही युक्रेनमध्येच होती. युरोपमधील सर्वांत मोठा आण्विक प्रकल्प हा युक्रेनमध्येच आहे. गेल्या ६ मासांमध्ये या प्रकल्पाच्या भोवतालच्या काही इमारतींना आग लागण्याच्या घटना घडल्या. रशियाने हा आण्विक प्रकल्प उडवण्याची धमकी दिल्याच्या बातम्याही मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या. पुन्हा एकदा अण्वस्त्रांमुळे निर्माण होणारी असुरक्षितता आणि अणूयुद्धाची चर्चा चालू झाली आहे.

५. अमेरिकेने जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर अणूबाँब टाकल्यानंतर जगात अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा चालू होणे

अण्वस्त्र आक्रमणांची धमकी देऊन ‘ब्लॅकमेलिंग’ करण्याचे प्रकारही झाले आहेत. उत्तर कोरियाने अणूआक्रमणाची धमकी देऊन अमेरिकेकडून पैसे उकळल्याच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु संयुक्त राष्ट्र्रांच्या सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य असणारा रशिया अणूआक्रमणाची धमकी देत असल्यामुळे याचे गांभीर्य अधिक आहे. अण्वस्त्र स्पर्धेचा प्रारंभ रशिया आणि अमेरिका यांच्यामुळे झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात वर्ष १९४५ मध्ये नागासाकी आणि हिरोशिमा या जपानच्या शहरांवर अमेरिकेने अणूबाँब टाकले होते. त्यानंतर रशियाने अणूबाँबची निर्मिती केली. नंतर हायड्रोजन बाँब, रासायनिक अस्त्रे, जैविक अस्त्रे  बनवण्यात आली. त्यातून जगात एक भयंकर स्पर्धा आकाराला आली. त्यानंतर रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान यांसारख्या देशांकडे अण्वस्त्रे आली. त्याचा परिणाम असा झाला की, वर्ष १९४५ ते २०२२ या काळात एकदाही अणूबाँबचा किंवा अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला नाही. थोडक्यात एकाहून अधिक राष्ट्रांकडे अण्वस्त्रे आल्यामुळे परस्परांचा धाक निर्माण झाला. २१व्या शतकात विकसित होऊ लागलेला अणूशस्त्रांचा प्रसार धोक्याची घंटा आहे. खरोखरच रशियाने अण्वस्त्राचा वापर केला, तर त्याच्यावर निर्बंध लादण्याची संधी ‘नाटो’ आणि अमेरिका सोडणार नाहीच. तसेच चीन वा भारतासारख्या देशांवरही रशियाशी कोणतेही संबंध न ठेवण्यासाठी दबाव आणला जाईल. हे परिणाम रशियालाही नकोच आहेत.

६. रशियाने अणूआक्रमणाच्या धमक्या देणे जगाची शांती आणि स्थैर्य यांसाठी अत्यंत धोकादायक !

रशिया-युक्रेन संघर्षानंतर अण्वस्त्रांचा प्रसार आणखी वाढणार आहे; कारण रशियाने आक्रमण केल्यानंतर अमेरिका आपल्या साहाय्याला येईल, याची युक्रेनला खात्री होती; परंतु अमेरिका प्रत्यक्ष साहाय्याला आली नाही. जपानच्या राज्यघटनेमध्ये असणार्‍या ‘कलम ९’नुसार त्याला स्वत:चे सैन्य विकसित करण्याचा अधिकार नाही; पण आज जपान घटनादुरुस्ती करून सैनिकीकरण करत आहे. दक्षिण कोरियानेही अण्वस्त्रांसाठी प्रयत्न चालू केले आहेत. ऑस्ट्रेलियानेही आण्विक पाणबुडीसाठी इंग्लंडशी करार केला आहे. या सर्वांतून एक अण्वस्त्र स्पर्धा आकाराला येऊ लागली आहे. अशा चिंताजनक परिस्थितीमध्ये रशियाकडून अणूआक्रमणाच्या धमक्या दिल्या जाणे, हे जगाची शांती आणि स्थैर्य यांसाठी अत्यंत धोकादायक आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.