जालंधर (पंजाब) – दीपावली उत्सवाच्या कालावधीत घरांची वीजजोडणी तोडण्याचे संदेश लोकांना पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे या संदेशामध्ये घराची वीजजोडणी बंद करण्याची चेतावणी देत एक भ्रमणभाष नंबर पाठवला जात आहे आणि त्यावर संपर्क करण्यास सांगितले जात आहे. वीजदेयके न भरल्यास रात्री ९.३० वाजता घरांचा वीजपुरवठा बंद करण्याची चेतावणी दिली जात आहे. पोलिसांनी अशा संदेशाविषयी लोकांना सतर्क रहाण्याचा सल्ला दिला आहे; मात्र लोकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या संदेशामागचे वास्तव काही वेगळेच आहे. लोकांची दिशाभूल करून पैसे उकळण्यासाठीच असे संदेश पाठवले जात आहेत. दीपावलीपूर्वी ‘ऑनलाईन’ फसवणूक करणारे चोर पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. (सायबर चोर सक्रीय होणे हे सायबर पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
१. संदेशामधील क्रमांकावर संपर्क केल्यानंतर ती व्यक्ती देयकाच्या बदल्यात एका बँक खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यास सांगते.
२. ग्राहकाने संबंधित बँक खात्यात पैसे हस्तांतरित करताच तो भ्रमणभाष क्रमांक बंद येतो.
वीज खाते संदेश पाठवत नाही, लोकांनी सतर्क रहावे ! – वीज खात्याचे आवाहन
वीज खात्याचे उपमुख्य अभियंता इंदरपाल सिंग यांनी सांगितले की, खात्याकडून असे संदेश पाठवले जात नाहीत. त्यामुळे लोकांनी या संदेशाविषयी सतर्क रहावे.