आज २२ ऑक्टोबर या दिवशी ‘धन्वन्तरि जयंती’, ‘धनत्रयोदशी’ आणि ‘यमदीपदान’ आहे. त्या निमित्ताने…

धन्वन्तरि जयंती

श्री. मोहन दाते

यंदाच्या वर्षी धनत्रयोदशी २ दिवस असतांना ती कधी साजरी करावी ?

वसुबारस पूजन झाल्यानंतर त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या दिवशी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी या दिवशी धन्वन्तरि पूजनाला विशेष महत्त्व आहे. यंदा धनत्रयोदशी दोन दिवस असणार आहे. ज्याप्रमाणे विविध प्रदेशांतील प्रदोषकाल आणि सूर्यास्तानुसार दोन संकष्टी चतुर्थी अन् दोन एकादशी येतात, त्याचप्रमाणे यंदा २ धनत्रयोदशी तिथी आल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर येथे २२, तर सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा अन् विदर्भ येथील जिल्ह्यांनी २३ ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी.

– श्री. मोहन दाते, ‘दाते पंचांग’कर्ते, सोलापूर.

(साभार : दैनिक ‘सकाळ’, १९.१०.२०२२)

‘धन्वन्तरिचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वन्तरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधी आणि रोग यांना बरे करण्याचे काम भगवान धन्वन्तरि करतो.’

– आधुनिक वैद्य श्री. राम लाडे (साप्ताहिक ‘लोकजागर’, नोव्हेंबर २०१०)

धनत्रयोदशी

‘धनत्रयोदशी’ म्हणजे एकत्रित तीन सण होत. समुद्रमंथनातून प्राप्त झालेले अमृत हे ‘१४ वे रत्न’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी त्यातील धन्वन्तरीची पूजा केली जाते. या दिवशी श्री लक्ष्मी, विष्णु, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्ये यांची पूजाही करतात. या दिवशी यमधर्माला दीपदान करण्याची प्रथा चालू झाली आहे.

वैशिष्ट्ये

१. व्यावहारिक : हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.

२. आध्यात्मिक : या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून रहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्‍या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)

यमदीपदान

प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कुणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये, याकरता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।

त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’)