भारतानेच आता ब्रिटनला वसाहत करावी !

ब्रिटनच्या बिकट परिस्थितीवर ३ वर्षांपूर्वीचे विनोदी कलाकार ट्रेव्हर नोआह याचे विधान असलेला व्हिडिओ होत आहे प्रसारित !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून याची शक्यता वर्तवण्यात येत होती. गेल्या ६ वर्षांत ब्रिटनमध्ये ४ पंतप्रधान होऊन गेले आहेत. ब्रिटनची आर्थिक स्थिती बिकट  होत चालली आहे. ‘या स्थितीची जाणीव दक्षिण आफ्रिकेतील कॉमेडियन ट्रेव्हर नोआह यांना यापूर्वीच  झाली होती’, असे म्हटले जात आहे; कारण त्यांचा वर्ष २०१९ चा एक व्हिडिओ आता पुन्हा सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात ते ‘भारतानेच आता ब्रिटनचा कारभार हातात घ्यावा आणि तो नीट करावा’, अशा प्रकारचे विधान करतांना दिसत आहे.

१. वर्ष २०१९ मध्ये जेव्हा ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची चर्चा होती, त्यावेळी ट्रेव्हर नोआह याने एका कार्यक्रमात म्हटले होते की, या घडीला ब्रिटनमधील परिस्थिती फार वाईट झाली आहे. मला वाटते त्याची वसाहत असलेल्या एखाद्या जुन्या देशाने त्यालाच वसाहत केले पाहिजे; कारण परिस्थिती खरच हाताबाहेर गेली आहे. ब्रिटिशांना कळतच नाही की, ते काय करत आहेत. भारताने ब्रिटनमध्ये यावे आणि म्हणावे ‘हे बघा, आम्हाला हे करण्यात अजिबात आनंद होत नाही; पण तुम्हाला ठाऊकच नाही की कारभार कसा करायला हवा ? आम्हाला हे सगळे हातात घेऊन व्यवस्थित करावे लागेल’, असे तो या व्हिडिओमध्ये बोलतांना दिसत आहे.

२. ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले. ‘भारतातील जनता कारभार व्यवस्थित सांभाळू शकत नाही’, असे ते म्हणत असत. देशाला स्वातंत्र्य देतांनाही ब्रिटिशांनी ‘इथली लोकशाही फार काळ टिकू शकणार नाही’, अशी हेटाळणीखोर टिप्पणी करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.