१. रामनाथी आश्रमाविषयी आलेल्या अनुभूती
१ अ. रामनाथी आश्रमातील भोजनकक्षाचे वातावरण श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिरातील वातावरणाप्रमाणे वाटून येथे ‘श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न आहे’, असे जाणवणे : ‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी भोजनकक्षातील वातावरण अगदी छान, शीतल आणि आनंदी वाटले. येथे ‘श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न असून मी श्री शांतादुर्गादेवीच्या सभागृहात महाप्रसाद ग्रहण करत आहे’, असे मला जाणवत होते. आदल्या दिवशी रात्री यज्ञाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होऊन माझे त्यांच्याशी जवळून बोलणेही झाले होते.
१ आ. सुगंधाची अनुभूती येणे : रामनाथी आश्रमात आमच्या खोलीच्या दारात पुष्कळच सुगंध येत होता. इतर साधकही मला म्हणाले, ‘‘तुमच्या खोलीच्या समोरच अधिक सुगंध येत आहे.’’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी आलेली अनुभूती
२ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे सतत सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, असे जाणवणे : आम्हाला प.पू. गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. त्या वेळी मला ३ वेळा सुगंध येऊन हलके वाटले. दुसर्या दिवशी पूर्ण दिवस आणि रात्रीही मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. मी त्यांना पूर्ण शरण गेले होते. ‘प.पू. गुरुदेव सतत सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटत होते. सेवा करतांना किंवा मला कशाचा ताण आला, तर गुरुदेव मला साहाय्य करतात. ‘मला काही हवे आहे’, असा विचार माझ्या मनात आला, तरी गुरुदेव ते लगेचच देतात. माझ्यासह माझ्या कुटुंबाला त्यांच्या छत्रछायेत ठेवणारे आणि आमचे आई-वडील अन् गुरु, म्हणजेच आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले
होय ! त्यांच्या चरणी माझे कोटीशः प्रणाम !
३. आपत्कालीन स्थितीविषयी आलेली अनुभूती
३ अ. सर्वत्र पाणीच पाणी असतांना हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण यांनी रामनाथी आश्रमाचे रक्षण करणे : २.८.२०२१ या दिवशी सकाळी १० वाजता मी नेहमीप्रमाणे मारुति स्तोत्र म्हणत होते. माझ्या मनात आदल्या दिवशी गावोगावी आलेल्या महापुराचा विचार होता; पण मारुति स्तोत्र म्हणत असतांना अकस्मात् डोळ्यांसमोर हनुमान आला. त्याने त्याच्या हातावर रामनाथी आश्रम उंच धरला होता. आश्रमातील साधकांना हे लक्षात आले नव्हते. ते नेहमीप्रमाणे आपापली सेवा करत होते. दोन मिनिटांनी मला रामनाथी आश्रमाच्या स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रातील भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात दिसला. त्याच्या हातातील सुदर्शनचक्राच्या ठिकाणी सनातनचा आश्रम होता आणि त्याने तो करंगळीवर उचलून धरला होता. आजूबाजूला सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. ‘सर्व साधक नेहमीप्रमाणे हसतमुखाने सेवा करत आहेत’, असे मला दिसले. तेव्हा मला पुष्कळ आनंद होत होता. माझ्या मुखातून ‘राधे-कृष्ण, गोपाळ-कृष्ण’ हे भजन चालू झाले. त्यानंतर अर्धा दिवस मी त्या स्थितीतच हरवले होते.’
– सौ. अदिती अनिल सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|