आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही !  

क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचे पाकला प्रत्युत्तर !

पाकमधील वर्ष २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेत सहभागी न होण्याची भारताची भूमिका

क्रीडामंत्री अनुराग ठाकुर

नवी देहली – भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकमध्ये जाण्याविषयीचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेईल. आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या स्पर्धांमध्ये पाकसमवेत खेळत आलो आहोत; मात्र द्विपक्षीय स्पर्धेच्या वेळी आमचे धोरण पूर्वी होते, तेच आजही आहे. आतंकवादाच्या सावटाखाली क्रिकेट खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी वर्ष २०२३ च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत पाकमध्ये जाणार नाही, असे घोषित केले होते. त्यावर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने टीका केली होती. त्यावर ठाकुर यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.