नवी देहली – रशियाने अणूबाँब टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी दिल्यानंतर अमेरिका सरकारने तेथील इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी २ सहस्र ३८९ कोटी रुपयांची आयोडिन औषधे खरेदी करण्याची घोषणा केली. याविषयी सरकारने म्हटले आहे की, रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक आक्रमणांपासून बचावासाठी ही औषधे खरेदी करण्यात आली आहेत. युरोपमध्येही किरणोत्सर्गरोधी औषधांची विक्री झपाट्याने वाढली आहे. रशिया आणि युक्रेन यांना लागून असलेल्या पोलंडची राजधानी वॉर्सा येथे अशा औषधांच्या वितरणासाठी ६०० हून अधिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
अणूबाँबमुळे होणार्या किरणोत्सर्गापासून रक्षण करण्यासाठी आयोडिन औषध महत्त्वाचे मानले जाते. पोटॅशियम आणि आयोडिन या २ रसायनांचे मिश्रण करून हे औषध सिद्ध केले जाते. त्याला ‘पोटॅशियम आयोडाईड’ असेही म्हणतात. हे औषध घेतल्यावर ते अधिक आयोडिन शरिरात जाण्यापासून रोखते. अणूस्फोटानंतर हवेत तरंगणारे कण शरिरात गेले, तर ते थायरॉईड ग्रंथीतील पेशी बनतात. ते नष्ट करण्याचे काम हे औषध करते. तसेच हे औषध या कणांमुळे निर्माण होणारे ट्यूमर नष्ट करण्याचे काम करते. हे औषध किरणोत्सर्गी आयोडिन शरिरात प्रवेश करण्याच्या धोक्यापासून लोकांचे प्राण वाचवते; परंतु अणूस्फोटानंतर बाहेर पडलेल्या इतर प्रकारच्या किरणोत्सर्गापासून ते संरक्षण करत नाही.