पुणे महापालिकेचा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण समारंभ
पुणे, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा २ पानांतून कळणार नाही. तरुणांना कुणामुळे हा देश उभा राहिला, हे कळणार नाही, देशाविषयी प्रेम निर्माण होणार नाही. त्यांच्या जीवनावरील पुस्तके मुलांना वर्षभर वाचून दाखवली पाहिजेत, तरच त्यांना छत्रपतींचे जीवन समजेल, असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आयोजित पुणे महानगरपालिकेच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण समारंभामध्ये बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले की, ‘विटी-दांडू’, ‘आट्यापाट्या’ हे सर्व खेळ मुलांमध्ये सामूहिक भावना वाढवणारे आहेत. मुलांना भारतीय खेळ यायला हवेत. मुलांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर ज्ञान देणे आवश्यक आहे. त्यांना म्हातारपणातही शिक्षक आठवले पाहिजेत, असे शिक्षकांनी मुलांना घडवले पाहिजे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत ‘का जन्माला आलो ?’, ‘कशासाठी जगलो ?’, ‘कशासाठी इथे आलो ?’ हे कळण्याची काहीही व्यवस्था नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी घेऊन येत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात ‘जीवन कळणे’ महत्त्वाचे आहे.