स्वप्नांच्या माध्यमातून साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला विविध प्रकारे केलेले साहाय्य !

‘माझ्या साधनेला घरून विशेष अनुकूलता नाही. त्यामुळे त्यासंदर्भातील विचार किंवा अडचणी यांना मधेमधे सामोरे जावे लागते; मात्र त्याही स्थितीत देव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला स्वप्नांच्या माध्यमातून साहाय्य करत आहेत. त्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांना प्रार्थना केल्यावर प.पू. डॉक्टरांचे दर्शन होणे आणि प.पू. बाबांच्या चरणी कृतज्ञताही व्यक्त होणे

एकदा कुडाळ ते रामनाथी अशा प्रवासासाठी धर्मरथामध्ये (धर्मप्रसारासाठी आवश्यक साहित्याची वाहतूक करणारा ट्रक) माझ्या समवेत नवीन साधक होता. त्याला रथाविषयी तितकी माहिती नव्हती. मी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केली, ‘आज मला एकट्यालाच रथ घेऊन जायचे आहे. तुम्ही माझ्या समवेत आहातच; पण रामनाथी आश्रमात गेल्यावर मला देवाचे दर्शन होऊ द्या.’ माझी अशी प्रार्थना सतत होत होती. विशेष म्हणजे आश्रमात पोचल्यावर मला प.पू. डॉक्टरांचे ५ मिनिटे दर्शनही झाले !  प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या गॅलरीच्या विरुद्ध दिशेने रथ उभा केला होता. मी रथात बसलो होतो. तितक्यात प.पू. डॉक्टर बाहेर आले. रथ विरुद्ध दिशेला असल्याने त्यांचे दर्शन होणे शक्य नव्हते; पण रथाच्या आरशामध्ये मला प.पू. डॉक्टर दिसत होते. त्यामुळे बसल्या जागी मला त्यांचे दर्शन घेता आले. प.पू. बाबांनी माझी इच्छा पूर्ण केल्याने मला पुष्कळ आनंद झाला आणि त्यांच्या चरणी कृतज्ञताही व्यक्त झाली. – एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. कुटुंबियांच्या संदर्भात ताण आल्यास प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) स्वप्नात येऊन साधनेचे सर्व दायित्व घेतल्याचे सांगणे आणि मनावरील ताण पूर्णपणे निघून जाणे

काही वेळा मला कुटुंबियांच्या संदर्भातील काही गोष्टींचा ताण येतो. तेच विचार माझ्या मनात येत असल्याने मन अस्वस्थ होते. त्याविषयी देवाला आत्मनिवेदन करून मी झोपतो. त्या वेळी प.पू. डॉक्टर माझ्या स्वप्नात येतात आणि मला सांगतात, ‘तुझ्या साधनेचे सर्व दायित्व मी घेतले आहे. तू साधनेकडे लक्ष दे.’ त्यांचे स्वप्नातील बोलणे ऐकताच माझ्या मनावरील ताण पूर्णपणे निघून जातो.

२. चांगली आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांनी स्वप्नात योग्य आणि सकारात्मक दृष्टीकोन देणे अन् त्यांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरच साहाय्य करत असल्याचे जाणवणे

काही वेळा चुका झाल्यास मला चुकांविषयीच्या सत्संगाचा ताण येतो. त्या विचारांत झोपल्यास ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीचे काही साधक स्वप्नात येऊन मला साधनेविषयी योग्य दृष्टीकोन देतात. ‘सत्संग आपल्या साधनेसाठी आहे. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेनुसार होते. देवाला तुला घडवायचे आहे. तू स्थिर राहून या सर्व परिस्थितीकडे पहा आणि त्यातून शिकून आनंद घे’, अशा प्रकारचे दृष्टीकोन स्वप्नात मिळतात. त्यामुळे ताण दूर होतो. ‘चांगली आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरच मला साहाय्य करत आहेत’, असे मला प्रकर्षाने जाणवते.

३. प.पू. डॉक्टरांनी स्वप्नात येऊन एका चुकीविषयीचे गांभीर्य अल्प झाल्याची जाणीव करून देणे

एकदा माझ्याकडून एक चूक झाली होती; परंतु तिच्याविषयी गांभीर्य आणि खंत मला अल्प प्रमाणात जाणवत होती. त्याही रात्री प.पू. डॉक्टर माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले, ‘तुझे चुकीविषयीचे गांभीर्य अल्प झाले आहे.’ त्यानंतर मला त्या चुकीची तीव्र खंत वाटली.

४. आई-वडिलांचे दायित्व घेतले असून केवळ साधनेकडे लक्ष देण्याविषयी प.पू. डॉक्टरांनी स्वप्नात येऊन सांगणे

सेवा करतांना काही वेळा घरच्या अडचणींचे विचार येऊन मला ताण यायचा. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांना आत्मनिवेदन करायचो. त्या रात्री झोपल्यावर प.पू. डॉक्टर स्वप्नात येऊन मला हात पुढे करायला सांगायचे. ते माझ्या हातात एक गाठोडे द्यायचे आणि परत मागायचे. त्यांच्या हातात गाठोडे दिल्यावर ते म्हणायचे, ‘तुझ्या आई-वडिलांचे दायित्व मी घेतले आहे. तू केवळ साधनेकडे लक्ष दे. सेवेतून आनंद मिळव.’

५. स्वप्नात प.पू. डॉक्टरांनी चारचाकी दाखवून साधनेच्या मार्गावर वेगाने वाटचाल करायची असल्याचे दाखवून देणे

एकदा मला स्वप्नात प.पू. डॉक्टर दिसले. त्यांनी मला एका चारचाकीचे दार उघडून दाखवले. ‘त्यात बसून साधनेच्या मार्गावर वेगाने वाटचाल करायची आहे’, असे त्यांना मला सांगायचे असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी माझ्याकडून ‘तुम्हीच मला साधनेच्या मार्गावरून वेगाने पुढे न्या’, अशी प्रार्थना आपोआप झाली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी आश्रमात अल्पाहार करतांना एका साधकाने त्याला माझ्याच संदर्भात पडलेले स्वप्न सांगितले. ‘त्यात त्या साधकाला प.पू. डॉक्टर दिसले आणि त्यांनी मला एका चारचाकीचे दार उघडून दाखवले.’ हे स्वप्न त्याने मला सांगितल्यावर मला आदल्या रात्री अगदी तसेच स्वप्न पडल्याची आठवण झाली आणि ‘प.पू. डॉक्टरांना माझ्या साधनेची किती काळजी आहे !’, याची जाणीव होऊन पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

६. वक्तशीरपणाच्या संदर्भात प्रयत्न अल्प होत असल्याने प.पू. डॉक्टरांनी स्वप्नात येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सांगणे

४.१.२०१८ या दिवशी दुपारी थोडा वेळ विश्रांती घेत असतांना प.पू. डॉक्टरांनी स्वप्नात येऊन मला सांगितले, ‘आता तू केवळ वक्तशीरपणासाठी प्रयत्न कर.’ प्रत्यक्षातही माझ्याकडून वक्तशीरपणाच्या संदर्भात प्रयत्न अल्प होतात. याची जाणीव त्यांनीच मला स्वप्नाच्या माध्यमातून करून दिली. त्यानंतर मी लगेचच स्वयंसूचना घेऊन त्या स्वभावदोषाच्या अनुषंगाने प्रयत्नांना प्रारंभ केला.

‘प.पू. डॉक्टर, स्वप्नांच्या माध्यमांतून तुम्ही मला वेळोवेळी स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून देऊन साधनेच्या मार्गावर आणत आहात, यासाठी कृतज्ञता ! ‘ही स्वप्नांची अमूल्य शिदोरी साधनाप्रवासात अखंड माझ्या समवेत राहू दे’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (डिसेंबर २०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक