पाक जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक ! – जो बायडेन

गेल्याच मासात शस्त्रास्त्रांसाठी ३ सहस्र कोटी रुपयांचे केले होते साहाय्य !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक म्हटले आहे. त्यांच्याकडे कोणत्याही नियंत्रणाखेरीज अण्वस्त्रे असल्याचेही बायडेन म्हणाले.

८ सप्टेंबरला अमेरिकेने एफ्-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी पाकला ४५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ३ सहस्र ५८१ कोटी रुपये स्वीकृत केले होते. गेल्या ४ वर्षांत इस्लामाबादला दिलेले हे सर्वांत मोठे सुरक्षा साहाय्य होते. असे असतांना बायडेन यांनी केलेल्या या वक्तव्याचा विविध माध्यमांतून विरोध होत आहे.

पाककडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे !

स्वीडनच्या ‘थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार चीन आणि पाकिस्तान यांच्याकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे आहेत. सध्या चीनकडे ३२०, तर पाकिस्तानकडे १६० अण्वस्त्रे आहेत. भारताकडे १५० अण्वस्त्रे आहेत.

रशियाकडे सर्वाधिक अणूबाँब !

सध्या जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे रशियाकडे असून त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. दोन्ही देशांकडे असे अणूबाँबही आहेत, जे संपूर्ण शहर उद्ध्वस्त करू शकतात.

पाकशी संबंध कायम ठेवून अमेरिकेला काय मिळत आहे, याचे अमेरिकेने चिंतन करावे ! – डॉ. जयशंकर

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, इस्लामाबादचे वॉशिंग्टनशी असलेले संबंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत. आता पाकशी संबंध कायम ठेवून अमेरिकेला काय मिळत आहे, याचे चिंतन अमेरिकेने केले पाहिजे. आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध कितपत सशक्त आणि लाभदायक ठरू शकतात, याचा विचार व्हायला हवा.

संपादकीय भूमिका

अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही खडे बोल सुनावणारे असे परराष्ट्रमंत्री हीच भारताची वास्तविक शक्ती होय ! 

संपादकीय भूमिका

  • जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असणार्‍या पाकिस्तानला शस्त्रांस्त्रांसाठी साहाय्य करणारी आणि ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ही म्हण सार्थ ठरवणारी अमेरिकाच जगासाठी खर्‍या अर्थाने धोकादायक आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?