सहस्रावधी बेवारस गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा
मुंबई – शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत पडलेल्या १० सहस्रांहून अधिक चारचाकी आढळल्या. त्यांपैकी ९ सहस्र ४५४ गाड्यांवर गेल्या ६ मासांत महापालिकेने नोटिसा चिकटवल्या होत्या. त्यांपैकी केवळ ३ सहस्र ५१९ जणांनी महापालिकेला प्रतिसाद देऊन स्वतःहून गाड्या हटवल्या; परंतु पालिकेला तब्बल ४ सहस्र १५७ गाड्या उचलाव्या लागल्या. केवळ २१६ मालकांनी पालिकेकडे पाठपुरावा करून त्यांच्या गाड्या सोडवल्या. सध्या साडेतीन सहस्रांहून अधिक गाड्या पालिकेकडे आहेत.
कोरोनाच्या काळात या गाड्यांचे दायित्व वाहतूक पोलिसांकडे तात्पुरते देण्यात आले होते. त्या काळात या गाड्या वाढलेल्या असण्याची शक्यता आहे. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, तसेच रस्त्याच्या कडेला गंजलेल्या अवस्थेतील वाहनांमध्ये पाणी साचून डासांचे प्रमाण वाढत होते. काही गाड्या गुन्हेगारांनी सोडलेल्याही असण्याचीही शक्यता होती.
बेवारस वाहनांमध्ये सर्वाधिक १ सहस्र वाहने ग्रँटरोड परिसरातील आहेत. वांद्रे आणि खार येथे ७०८, कुर्ला ७९५, भायखळा ६७३, वडाळा आणि माटुंगा येथून ६११ गाड्या कह्यात घेण्यात आल्या.