बड्या थकबाकीदारांची कर्जवसुली नाममात्रच ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

बड्या कर्जदारांची नावे घोषित करण्यास ‘कॅनरा बँके’चा नकार !

विवेक वेलणकर

पुणे – सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री. विवेक वेलणकर यांनी ‘कॅनरा बँके’कडे माहितीच्या अधिकारात प्रतिवर्षी १०० कोटींपेक्षा अधिक थकित कर्ज असलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या निर्लेखित केलेल्या कर्जखात्यांची नावे, रक्कम आणि त्यांच्या मार्च अखेरपर्यंतच्या वसुलीची माहिती मागितली होती. त्यावर अधिकोषाने गत १० वर्षांत बड्या कर्जदारांचे १ लाख २९ सहस्र ८८ कोटी रुपये कर्ज निर्लेखित केल्याचे उत्तर दिले; मात्र या निर्लेखित कर्जांच्या वसुलीची माहिती उपलब्ध नसल्याचे अधिकोषाने सांगितले असून बड्या कर्जदारांची नावेही वैयक्तिक माहितीचा बहाणा करून देण्यास टाळाटाळ केली आहे. केंद्र सरकारने कर्जवसुलीसाठी कठोर कायदे करूनही बड्या थकबाकीदारांची कर्जवसुली नाममात्रच असल्याची दुर्दैवी वस्तूस्थिती आहे, असे श्री. वेलणकर यांनी सांगितले.

श्री. वेलणकर पुढे म्हणाले की, या प्रकारामुळे कर्जाचे निर्लेखन म्हणजे कर्जमाफी नसून, निर्लेखित कर्जांची वसुली चालूच रहाते, हा अधिकोषांचा दावा पोकळ ठरला आहे. सर्वसामान्य कर्जदाराचे हप्ते थकल्यावर वसुलीसाठी त्याचे नाव, गाव, पत्त्यासकट मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस दिली जाते; पण बड्या थकबाकीदारांची कर्जे निर्लेखित करूनही त्यांची नावे गोपनीय ठेवली जातात, हे अनाकलनीय आहे. (सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावणार्‍या अधिकोषांनी कर्ज न फेडणार्‍या थकबाकीदारांची माहिती गोपनीय ठेवणे अन्यायकारकच आहे. – संपादक)