संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानने पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र : भारताने सुनावले खडे बोल

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानचे भारतद्वेषी कृत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत युक्रेन-रशिया युद्धाच्या सूत्रावर चर्चा चालू होती आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी काश्मीरचे सूत्र उपस्थित करून त्याची रशिया-युक्रेन युद्धाशी तुलना करत होते. यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी त्यांना खडे बोल सुनावले. रुचिरा कंबोज म्हणाल्या, ‘‘युक्रेन-रशिया युद्धासारख्या गंभीर सूत्रांवर संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होत आहे; मात्र या मंचाचा पुन्हा एका देशाकडून गैरवापर होत असल्याने आम्हाला आश्‍चर्य वाटते. माझ्या देशाविरुद्ध क्षुल्लक आणि निरर्थक वक्तव्य केले जात आहे.’’

पाकिस्तान सामूहिक अवमानास पात्र ! – रुचिरा कंबोज

‘वारंवार खोट बोलण्याची मानसिकता असलेला देश प्रतिदिन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो; पण त्याचा काही उपयोग होत नाही. अशा वक्तव्यानंतर पाकिस्तान सामूहिक अवमानास पात्र आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने विश्‍वास ठेवला किंवा न ठेवला, तरी जम्मू-काश्मीरचा संपूर्ण प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पुढेही रहाणार आहे’, असे रुचिरा कंबोज यांनी सांगितले. ‘आम्ही पाकिस्तानला आतंकवाद थांबवण्यास सांगतो, जेणेकरून आमच्या नागरिकांना त्यांच्या जीवनाचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळू शकेल’, असे कंबोज पुढे म्हणाल्या.

संयुुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत युक्रेन-रशिया युद्धावर मतदान – भारताची तटस्थ भूमिका

या सर्वसाधारण सभेत युक्रेनच्या ४ प्रदेशांवर रशियाने ताबा मिळवल्याचा निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला. १४३ देशांनी ठरावाच्या बाजूने, तर ५ देशांनी विरोधात मतदान केले. भारतासह ३५ देशांनी मतदानात भाग घेतला नाही.