पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे प्रकरण
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे नेते आणि गुजरात राज्याचे संयोजक गोपाल इटालिया यांना देहली पोलिसांनी १३ ऑक्टोबरला अटक केली. गोपाल इटालिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करतांना दिसत होते. तेव्हापासून भाजप सातत्याने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत होता.
#DelhiPolice detains #AamAadmiParty`s Gujarat chief Gopal Italia | Here’s whyhttps://t.co/UkcbG1o8oF
— Zee Business (@ZeeBusiness) October 13, 2022
पंतप्रधान मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणीविषयीच्या व्हिडिओची नोंद घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी गोपाल इटालिया यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्याविषयी नोटीस पाठवली होती; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तसेच त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात बळजोरीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. ‘कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी’, असे शर्मा यांनी पोलिसांनी सांगितले होते.